चित्रपट महामंडळाला स्थिर कार्यकारिणी देणार: राजेभोसले:मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनलची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्वाही

0
68f81ba4-2cf7-4d58-bd98-006107dbd17b_1780481534095.jpg




अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थ पॅनलने महामंडळाला स्थिर, पारदर्शक आणि विकासाभिमुख कार्यकारिणी देण्याची ग्वाही दिली आहे. पॅनलचे प्रमुख तथा चित्रपट निर्माते मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अभिनेता सुशांत शेलार, दिग्दर्शक दीपक कदम, लेखक राज काझी, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निर्माते सुनील महाजन, दिग्दर्शक अजित शिरोळे, कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप यांच्यासह महामंडळाचे माजी खजिनदार संजय ठुबे उपस्थित होते. मेघराज राजेभोसले यांनी सांगितले की, समर्थ पॅनलचे ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि संकलक विजय खोचीकर हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १४ उमेदवारांनाही सभासदांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, संगीतकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांसह सर्व घटकांच्या समस्या सोडवणे तसेच संपूर्ण मराठी चित्रपट उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हा समर्थ पॅनलचा मुख्य उद्देश आहे. महामंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सकारात्मक प्रयत्न केले होते, मात्र प्रतिस्पर्धी गटाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महामंडळाचे माजी खजिनदार संजय ठुबे यांनी यावेळी प्रतिस्पर्धी पॅनलकडून करण्यात येणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांचे खंडन केले. त्यांच्या कार्यकाळात मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या आर्थिक कारभारात शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणले गेले. आर्थिक व्यवहारांचे नियोजन करून संस्थेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केल्याचा दावा त्यांनी केला. मागील ५५ वर्षांच्या इतिहासात न झालेली अनेक विकासकामे आपल्या कार्यकारिणीच्या काळात पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. लेखक राज काझी यांनी समर्थ पॅनलच्या विजयानंतर मराठी चित्रपट उद्योग अधिक किफायतशीर, स्पर्धात्मक आणि जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे सांगितले. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मराठी चित्रपटांना नव्या बाजारपेठा उपलब्ध होत असून, त्या संधींचा प्रभावी लाभ मिळवून देण्यासाठी महामंडळ पुढाकार घेईल, असेही ते म्हणाले. यावेळी वक्त्यांनी महामंडळाचे माजी अध्यक्ष अजय सरपोतदार यांच्या कार्यकाळाचाही उल्लेख केला. त्यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाला एक प्रतिष्ठित स्थान प्राप्त झाले होते. त्यानंतर काही काळ कामकाजात अडथळे निर्माण झाले. मात्र, मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाचा कारभार पुन्हा मार्गी लावण्याचे प्रयत्न झाले. कार्यकाळाच्या अखेरीस अंतर्गत वाद, आरोप-प्रत्यारोप आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे काही प्रमाणात कामकाज प्रभावित झाले असले तरी, भविष्यात हे सर्व प्रश्न सोडवून महामंडळ अधिक गतिमान, सक्षम आणि सभासदाभिमुख करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *