हुंड्यासाठी छळ, 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या:प्रेमविवाहानंतर पतीसह सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल
![]()
प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी छळ केल्याने एका 20 वर्षीय तरुणीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तरुणीच्या पतीसह सासू आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत तरुणीच्या आईने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती अजित दशरथ पवार (वय 25), सासू अनुसया दशरथ पवार (वय 55) आणि नणंद अलका लहू जाधव (वय 30) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी पती मूळचा लातूरचा असून सध्या तो पुण्यात राहतो. फिर्यादी महिलेच्या मुलीने सुमारे वर्षभरापूर्वी अजित पवार याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती, सासू आणि नणंदेने तरुणीचा हुंड्यासाठी छळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी तरुणीकडे माहेरहून दागिने घेऊन येण्याची मागणी केली. हा छळ असह्य झाल्याने तरुणीने टोकाचे पाऊल उचलत कीटकनाशक प्राशन करून आपले जीवन संपवले. मुलीचा हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक एन. डोईफोडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तुळशीबागेत ज्येष्ठ महिलेची फसवणूक स्वस्तात सोन्याचे मणी देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेकेडील सोन्याचे दागिने आणि रोकड असा 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आल्याची घटना तुळशीबागेत घडली. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला धनकवडीतील मोहननगर भागात राहायला आहेत. 2 जून रोजी ज्येष्ठ महिला तुळशीबागेतून निघाल्या होत्या. त्या वेळी दोन महिलांनी त्यांना अडवले. स्वस्तात सोन्याचे मणी देेण्याचे आमिष त्यांना दाखविले. त्यानंतर दोघींनी ज्येष्ठ महिलेला बोलण्यात गुंतविले. ज्येष्ठ महिलेकडील सोन्याचे मणी आणि रोकड असा 50 हजार 610 रुपयांचा ऐवज चोरून महिला पसार झाल्या. दागिने आणि रोकड चोरल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी तुळशीबागेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस हवालदार एस खरात तपास करत आहेत.
