भंडारा-गोंदियात राजकीय ट्विस्ट!:भाजपच्या गोटात काँग्रेसचे 'प्लांटेड' नगरसेवक? पटोलेंनी हेरगिरीसाठी पाठवल्याची चर्चा
![]()
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लाखांदूर नगरपंचायतीच्या चार काँग्रेस नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी, हा पक्षांतर नसून महायुतीच्या गोटात हेरगिरी करण्यासाठी नाना पटोले यांनी खेळलेली ‘स्मार्ट मूव्ह’ असल्याचा दावा काँग्रेसच्या एका जिल्हा महासचिवाने केला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या चार नगरसेवकांमध्ये मुकेश उर्फ बंटी सहजानी यांचे नाव प्रमुख आहे. सहजानी हे नाना पटोले यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे मुख्य ‘फायनान्सर’ मानले जातात. लाखांदूरमध्ये ‘नानांचा शब्द म्हणजेच बंटी सहजानी’ असे समीकरण असताना, ते तीन महिला नगरसेविकांसह अचानक भाजपमध्ये का गेले, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या जिल्हा महासचिवांनी दावा केला आहे की, भाजपमध्ये गेलेले चारही नगरसेवक आजही काँग्रेसच्या संपर्कात आहेत. महायुतीचे मतदार कुठे फिरतात आणि त्यांची रणनीती काय आहे, यावर नजर ठेवण्यासाठीच त्यांना तिकडे पाठवण्यात आले आहे. यामुळे नाना पटोले यांनीच या नगरसेवकांना भाजपमध्ये ‘प्लांट’ केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असतानाही, तत्कालीन भाजप खासदार नाना पटोले यांच्या रणनीतीमुळे भाजपचे डॉ. परिणय फुके विजयी झाले होते. यावेळी महाविकास आघाडीकडे बहुमत नसतानाही, पटोले यांनी तीच जुनी खेळी खेळत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून दिलीप बन्सोड यांना उतरवले आहे. तसेच प्रफुल्ल अग्रवाल यांना काँग्रेस समर्थित अपक्ष म्हणून रिंगणात ठेवून भाजपसमोर चक्रव्यूह रचला आहे. या गुप्त रणनीतीला महायुतीमधील अंतर्गत कलहाची जोड मिळत आहे. महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा अर्ज भरताना प्रफुल्ल पटेल, डॉ. परिणय फुके यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे (शिंदे गट) स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर आणि शिवसेनेचे मतदार या सोहळ्यातून पूर्णपणे अनुपस्थित होते.
