दिलीप बर्वे, अभिषेक जाखडे यांना वि. वि. बोकील स्मृती पुरस्कार:किरण केंद्रे म्हणाले, मुलांसाठी योग्य साहित्य देणे महत्त्वाची जबाबदारी

0
5536839f-d19d-4028-873e-e34f41f0e8ee_1780464683991.jpg




महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रसिद्ध विनोदी लेखक वि. वि. बोकील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा बालवाङ्मय पुरस्कार दिलीप बर्वे आणि अभिषेक जाखडे यांना प्रदान करण्यात आला. ‘किशोर’ मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. यावेळी बोलताना केंद्रे यांनी, मुलांच्या विचारांशी सुसंगत उत्तम साहित्यकृती उपलब्ध करून देणे ही पालक, लेखक आणि प्रकाशकांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. हा पुरस्कार दिलीप बर्वे यांच्या ‘छोट्या अणूची मोठी गोष्ट’ आणि अभिषेक जाखडे यांच्या ‘जंगलातलं चांदणं’ या पुस्तकांना विभागून देण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक आणि वि. वि. बोकील यांचे सुपुत्र रमेश बोकील उपस्थित होते. केंद्रे पुढे म्हणाले की, मुलांचा मेंदू केवळ माहिती साठवणुकीचे साधन नसून ते प्रक्रिया करणारे केंद्र आहे. पालकांनी मुलांवर उत्तम वाचनाचे संस्कार करून सर्जनशील पिढी घडवणे आवश्यक आहे. आजची पिढी वाचन करत नाही, असा आरोप करताना पालकच मुलांना मनोरंजनाची इतर माध्यमे देतात, पण उत्तम साहित्यकृती देत नाहीत, हे वास्तव त्यांनी अधोरेखित केले. मराठी बालसाहित्याविषयी मंथन होणे आवश्यक असून, अनेक लेखक आपल्या बालपणाबाहेर जाऊन लेखन करत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पुरस्काराला उत्तर देताना दिलीप बर्वे म्हणाले की, ते त्यांच्या साहित्यकृतींमधून शास्त्रीय संशोधनात्मक विषय सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. यातून बालवाङ्मयाचे विचारविश्व आणि भावविश्व खुले होते, तसेच सामाजिक समरसता आणि मनोरंजनातून ज्ञान देता येते. काल्पनिक विषयांमधून बाहेर पडणाऱ्या आजच्या पिढीतील वाचकांसाठी विज्ञानाशी सुसंगत साहित्यनिर्मिती करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. अभिषेक जाखडे यांनी सांगितले की, मुलांसाठी पुस्तके खरेदी करताना त्यांना बालसाहित्याची ओढ लागली. मुलांच्या वयानुसार सहजसोप्या भाषेत, रंगीबेरंगी आणि आकर्षक चित्रे असणाऱ्या पुस्तकांची निर्मिती करावी या भावनेतून त्यांनी बालसाहित्य क्षेत्रात लेखनास सुरुवात केली. मुलांना मराठी भाषा यावी आणि तिची थोरवी कळावी या सकारात्मक अस्वस्थतेतून त्यांचे लिखाण सुरू झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *