चिमुकलीला पत्र्याच्या शेडमध्ये नेत असताना फटीतून पाहिले:आम्हाला बघून त्याने दगड मारले, नसरापूर प्रकरणी तीन मुलांची महत्त्वाची साक्ष
![]()
पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, आरोपीवर दोषनिश्चिती करण्यात आली आहे. या खटल्यात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली असून, घटनेच्या वेळी आरोपीला पीडित चिमुकलीसोबत पत्र्याच्या शेडमध्ये जाताना पाहणाऱ्या तीन मुलांनी न्यायालयात निर्भीडपणे आपली साक्ष नोंदवली आहे. विशेष म्हणजे, या धाडसी मुलांनी येरवडा कारागृहात झालेल्या ओळख परेडदरम्यान तसेच न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर असलेल्या आरोपीला अचूक ओळखले असल्याने, या खटल्यात पोलिसांच्या तपासाला मोठा दुजोरा मिळाला आहे. घटनेच्या दिवशी ही तिन्ही मुले त्याच परिसरात खेळत होती. त्यांनी आरोपीला हटकण्याचा प्रयत्न केला असता, त्याने या मुलांवर चक्क दगडफेक केली होती. तरीही न घाबरता या मुलांनी गोठ्याच्या फटीतून आरोपीला पाहिले होते. या संपूर्ण घटनाक्रमाची अत्यंत निर्भीडपणे साक्ष या तिन्ही मुलांनी न्यायालयासमोर दिली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 82 साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली होती, ज्यापैकी आतापर्यंत 16 साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात नोंदवण्यात आली आहे. पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जात असल्याचे मुलांनी पाहिले या गुन्ह्याच्या खटल्यात तीन प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, न्यायालयाने ती नोंदवून घेतली आहे. घटनेच्या दिवशी ही तिन्ही मुले त्याच परिसरात खेळत होती. त्यावेळी आरोपीने त्यांना हटकले होते. त्यानंतर आरोपी पीडित मुलीला गोठ्याशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जात असल्याचे या मुलांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी गोठ्याच्या फटीतून आत पाहिले असता, त्यांना तिथे आरोपी दिसला. मुलांना बघून आरोपीने दगड मारले या मुलांनी आपल्याला पाहिल्याचे लक्षात येताच आरोपीने त्यांच्या दिशेने दगडफेक केली, ज्यामुळे ही मुले तेथून निघून गेली. हा सर्व थरारक घटनाक्रम या धाडसी मुलांनी न्यायालयासमोर सविस्तरपणे कथन केला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान या मुलांनी यापूर्वीच न्यायालयासमोर आपला जबाब नोंदवला होता, तसेच ओळख परेडमध्येही त्यांनी आरोपीला अचूकपणे ओळखले होते.
