
अमरावती जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देण्यासाठी दिशा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. खासदार बळवंतराव वानखडे यांनी अध्यक्षस्थानावरून बैठकीचे नेतृत्व केले.
.
बैठकीला राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील रस्ते, वीज, पाणी, घरकुल, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर देण्यात आला.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. माखला ते माडीझडप मार्गावरील खापरा येथील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. मेळघाटातील रस्त्यांच्या बांधकामातील वन विभागाच्या अडचणी सोडवण्यावर चर्चा झाली.
धारणी व चिखलदरा क्षेत्रातील १६ गावांमध्ये फोर जी टॉवर उभारणीबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. जलजीवन मिशन अंतर्गत प्रगतीपथावरील योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रहाटगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत निकृष्ट बांधकाम निर्लेखित करून नवीन दर्जेदार इमारत बांधण्याचे आदेश देण्यात आले. घरकुल लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांचे वाढीव अनुदान तत्काळ देण्याच्या सूचना देण्यात आल्या. विकास कामांमध्ये गुणवत्ता राखण्याचे आवाहन करण्यात आले.