डॉ. राजीव पोतदार यांना भाजपाची उमेदवारी:काँग्रेस बॅकफूटवर, अतुल लोंढे यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी

0
c99d4520-ac8c-4143-8851-9cdb9dd53d75_1780318149838.jpg




नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपने डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी दिली असताना, महाविकास आघाडीने अखेरच्या क्षणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना रिंगणात उतरवले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. या जागेसाठी भाजपने माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर या जागेचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता डॉ. पोतदार बावनकुळेंचे वारसदार म्हणून रिंगणात उतरले आहेत. डॉ. पोतदार यांच्या नावासाठी भाजपमधून माजी महापौर अनिल सोले, नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, दयाशंकर तिवारी आणि संघटनात्मक संपर्कप्रमुख किशोर रेवतकर यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, जिल्हा भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे डॉ. पोतदार यांच्यासाठी केलेली शिफारस अखेर यशस्वी ठरली. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून शेवटपर्यंत चर्चा सुरू होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीला काही तास शिल्लक असताना, काँग्रेसने मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना उमेदवारी जाहीर केली. संख्याबळाअभावी काँग्रेस या निवडणुकीत पूर्णपणे बॅकफूटवर आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. एकूण ८९६ मतदारांपैकी (९७ पदे रिक्त असल्याने ८२६ प्रत्यक्ष मतदार) भाजपचे ५२० मतदार आहेत, जे एकूण मतदारांच्या ६३ टक्के आहेत. महायुतीकडे (भाजप ५२० + शिंदेसेना ३० + अजित पवार गट ९) एकूण ५५९ मते आहेत, म्हणजेच ६७.६७ टक्के. या तुलनेत महाविकास आघाडीकडे (काँग्रेस १७० + शरद पवार गट १९ + उद्धवसेना ११) केवळ २०० मते आहेत. भाजपकडे एकट्याच्या जोरावर विजयासाठी आवश्यक असणारे स्पष्ट बहुमत असल्याने डॉ. राजीव पोतदार यांचा विजय सुकर मानला जात आहे. पराभव समोर दिसत असल्याने काँग्रेसमधील बड्या नेत्यांपैकी कोणीही ही निवडणूक लढण्यास इच्छुक नव्हते. या पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराचा कार्यकाळ १ जानेवारी २०२८ पर्यंत असणार आहे, म्हणजेच नवीन आमदाराला सुमारे १९ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed