गडकरी, दादोजी कोंडदेव पुतळ्यांच्या पुनर्स्थापनेची मागणी:सकल ब्राह्मण समाजाने पुण्याच्या महापौरांना दिले निवेदन

0
edb388e6-a020-4234-af98-40a6fc5705f2_1780049308506.jpg




श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी आणि गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करण्याची मागणी सकल ब्राह्मण समाजाने केली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांना निवेदन देण्यात आले. जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानातून गडकरींचा पुतळा हटवण्यात आला होता, तर दादोजी कोंडदेव यांचा पुतळा लाल महालातून हलवण्यात आला होता. या निवेदनात, छत्रपती संभाजी उद्यानात नुकत्याच स्थापित झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याबद्दल पुणे महानगरपालिका आणि महापौरांचे अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. निवेदनाद्वारे महापौरांचे लक्ष जुन्या मागण्यांकडे वेधण्यात आले. सामाजिक सलोख्याचे कारण देत काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजी उद्यानातून नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्यात आला होता. हा पुतळा ज्येष्ठ साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी बसवला होता. त्यामुळे या ऐतिहासिक पुतळ्याची योग्य ठिकाणी सन्मानाने पुनर्स्थापना करण्याची मागणी करण्यात आली. याचबरोबर, काही वर्षांपूर्वी लाल महालातून हटवण्यात आलेला गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचा पुतळा सध्या सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात दुरवस्थेत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या ऐतिहासिक पुतळ्याची हेळसांड थांबवून त्याचीही पुणे शहरात योग्य ठिकाणी सन्मानाने पुनर्स्थापना करण्याची मागणी करण्यात आली. सकल ब्राह्मण समाज संघटनेमध्ये पुणे शहरातील सुमारे ३५ ब्राह्मण संस्था सदस्य आहेत. पुणे महानगरपालिका शहरातील सर्वच महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुतळे व स्मारकांचा सन्मान राखते. याच धर्तीवर या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांचा सन्मान राखून त्यांची पुनर्स्थापना करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना सकल ब्राह्मण समाजाचे समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, सह-समन्वयक ॲड. ईशानी जोशी, प्रवक्ते विश्वजीत देशपांडे, निमंत्रक संदीप खर्डेकर उपस्थित होते. त्यांच्यासोबत मंदार रेडे, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकिकर, मनोज तारे, तृप्ती तारे आणि इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed