सावरकर जयंतीनिमित्त पुण्यात अभिवादन कार्यक्रम:‘भारतरत्न’ सन्मानासाठी केंद्र-राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार
![]()
पुणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि विश्व हिंदू जागृती फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे आणि सीए सर्वेश मेहेंदळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रितम थोरवे, सचिव नयन ठाकूर, विश्वस्त ॲड. श्रीराम जोशी, अमरनाथ देवळालीकर, आर्य नयन ठाकूर, तसेच विश्व हिंदू जागृती फाउंडेशनच्या विश्वस्त मुक्तीका वाटखेडकर यांच्यासह अनेक सावरकरप्रेमी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, हिंदुत्व विचारधारा आणि सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. तरुण पिढीने सावरकरांचे विचार आत्मसात करून राष्ट्रहितासाठी कार्य करावे, असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले. मिलिंद एकबोटे यांनी हिंदू जनजागृती, संघटन आणि लोकसंख्या वाढीबाबत सजग राहण्याच्या गरजेवर मार्गदर्शन केले. हिंदूंनी सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक स्तरावर एकत्र येऊन भविष्यातील पिढ्यांसाठी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनने यावेळी एक महत्त्वाची मागणी केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, यासाठी मिलिंद एकबोटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील वर्षी ‘भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ या नावाने त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जाईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. या मागणीला उपस्थित सावरकरप्रेमींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
