नीट पेपरफुटीविरोधात ग्राहक कल्याण परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे:स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मागणी

0
30614a35-417a-47a0-b24c-8fad691ebb79_1779899696259.jpg




सध्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये होत असलेले गैरप्रकार आणि विशेषतः नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अहोरात्र कष्ट करून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर पेपरफुटी आणि आर्थिक देवाणघेवाणीमुळे मोठा अन्याय होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत आहे. अनेक खाजगी कोचिंग क्लासेसकडून अव्वाच्या सव्वा फी आकारली जात आहे, ज्यामुळे शिक्षणाचे व्यापारीकरण झाले आहे. यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. विविध विभागांच्या स्पर्धा परीक्षा अनेक दिवसांपासून रेंगाळल्या आहेत. परीक्षा वेळेत न झाल्यामुळे लाखो युवकांचे शैक्षणिक व व्यावसायिक आयुष्य अनिश्चिततेत अडकले असून तरुणांमध्ये नैराश्य व बेरोजगारीची समस्या गंभीर बनत चालली आहे. ग्राहक कल्याण परिषदेने ‘नीट’सह सर्व स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, पेपरफुटी व गैरव्यवहार करणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करावी, खाजगी कोचिंग क्लासेससाठी शासनाने फी संरचना आणि नियंत्रण यंत्रणा लागू करून नियमावली तयार करावी, विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी कोचिंग संस्थांची नियमित तपासणी करावी, रेंगाळलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात, विद्यार्थ्यांच्या हितासाठी संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत तांत्रिक सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यात यावी, इत्यादी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. या निवेदनावर परिषदेचे पदाधिकारी गजानन मुदगल, रोहण डोमणे आणि इतर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed