2029 मध्येही तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार:सुनेत्रा पवारांना अर्थखाते मिळणारच, दिल्ली दौऱ्यात भाजप सन्मान राखेल- हसन मुश्रीफ
![]()
प्रत्येक पक्ष हा निवडणुकीची स्वतंत्र तयारी करत असतो. पण मला वाटते की 2029 मध्येही महायुती म्हणून तिन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे जातील. प्रफुल्ल पटेल हे काही कामानिमित्त बैठकीला उपस्थित नव्हते. प्राजक्त तनपुरे यांनी विधान सभेची पोटनिवडणूक लढवली नाही त्यावेळेसच ते महायुतीकडे आहेत हे सिद्ध झाले होते, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. हसन मुश्रीफ म्हणाले की, महायुतीमध्ये अर्थखाते हे आमच्या पक्षाकडे होते, पण सुनेत्रा पवार या नव्यानेच उपमुख्यमंत्री झाल्यामुळे बजेट येणार असल्याने ते खातं नंतर राष्ट्रवादीला देण्यात येईल असे सांगण्यात आले होते, पण ते अद्याप दिले नाही अशा भावना सर्व नेते मंडळींनी व्यक्त केल्या असल्या तरी सुनेत्रा पवार आज दिल्लीत गेल्या आहेत यावर निश्चितच निर्णय होईल आणि भाजपा सन्मान राखेल असे मुश्रीफांनी म्हटले आहे. तटकरेंनी खंत व्यक्त केली हसन मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालच्या बैठकीत आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत उभे आहोत असे सर्वच नेत्यांनी सांगितले आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबद्दल ज्या बातम्या दाखवल्या जात आहे तशा काही भावना त्यांनी व्यक्त केल्या नाही. आम्हाला टार्गेट केले गेले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सुनेत्रा पवारांनी शपथ घ्यावी अशी सर्वांची इच्छा होती पण या दोघांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला ही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. गोकुळचे जागावाटत मतदार याद्यानंतर कळेल हसन मुश्रीफ म्हणाले की, गोकुळची निवडणूक ही आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत. महायुतीचाच चेअरमन होणार हे फायनल आहे. सतेज पाटील यांनी काय करावे हा त्यांचा विषय आहे. मतदार यादी झाली की जागा वाटप काय ते मुख्यमंत्र्यांसमोर ठरेल. वेळेवर निवडणूक होईल. अखाती देशांत तूप-लोणी निर्यातीसाठी ‘हलाल’ प्रमाणपत्र गरजेचे हसन मुश्रीफ म्हणाले की, गोकुळमार्फत अनेक दिवसांपासून अखाती देशांमध्ये आपण तुप आणि लोणी पाठवत असतो. आंतरराष्ट्रीय निर्यात करण्यासाठी हे हलाल प्रमाणपत्र गरजेचे असते ते 2022 मध्येच काढले आहे. माझा मुलगा तर आता अध्यक्ष झाला आहे. उगाच काही काम नसल्याने आणि निवडणूक लागल्याने काही तरी विषय काढायचा म्हणून हा विषय काढला आहे.
