फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, विदर्भ- मराठवाड्यात उद्योगक्रांती:राज्यात उभारले जाणार ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विशाल प्रकल्प; हजारो तरुणांना रोजगार
![]()
राज्यात औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ₹89,731 कोटींच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे राज्यात सुमारे 20 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये हे उद्योग उभारले जाणार असून त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार मिळणार आहे. राज्यात हरित ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. उद्योग विभागाच्या बैठकीत अदानी समूहासह 5 मोठ्या उद्योग कंपन्यांच्या प्रकल्पांना विशेष सवलती आणि प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या औद्योगिक धोरणाअंतर्गत सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. नवीन उद्योग उभारणीमुळे गुंतवणूक वाढावी, रोजगार निर्माण व्हावा आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था तयार व्हावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पांमुळे केवळ मोठ्या शहरांनाच नव्हे तर राज्यातील मागास आणि औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित भागांनाही फायदा होणार आहे. सरकारच्या माहितीनुसार, सहाय्यक उद्योग, वाहतूक व्यवस्था, पुरवठा साखळी आणि सेवा क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. लघु आणि मध्यम उद्योगांना याचा फायदा होईल, तसेच स्थानिक व्यवसायांनाही नवसंजीवनी मिळेल. विशेषतः तरुणांसाठी तांत्रिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याने रोजगारक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील लिंगा-कळमेश्वर येथे अदानी एंटरप्रायझेस कंपनीकडून ₹70,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. येथे कोल मायनिंग आणि गॅसिफिकेशन प्रकल्प उभारला जाणार असून या माध्यमातून सुमारे 10 हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक गुंतवणुकांपैकी एक मानला जात आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथे मेसर्स अक्षत ग्रीनटेक लिमिटेड कंपनी ₹12,500 कोटींची गुंतवणूक करून सोलर सेल मॉड्युल उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पामुळे जवळपास 4 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, मेसर्स एनएलएमके इंडिया कोटिंग कंपनी छत्रपती संभाजीनगर येथे ₹840 कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातून 153 जणांना रोजगार मिळणार आहे. एचएस हयुसंग इंडिया कंपनी नागपुरात ₹1,740 कोटींचा प्रकल्प उभारणार असून सुमारे 400 रोजगार निर्माण होणार आहेत. तर गॅफाइट कंपनी नाशिकमध्ये ₹4,651 कोटींची गुंतवणूक करणार असून या प्रकल्पातून 1,066 रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये ऊर्जा, इलेक्ट्रिक स्टील, सोलर सेल, वेफर्स पॅनेल आणि आधुनिक औद्योगिक उत्पादन क्षेत्रांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले की, महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, तसेच राज्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात उद्योगवाढीला वेग मिळणार असून भविष्यात आणखी मोठ्या गुंतवणुकीसाठी वातावरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
