मी माझ्या सख्ख्या भावाचा खून केलाय!:नियंत्रण कक्षाला फोन करून फर्निचर कामगाराने दिली गुन्ह्याची कबुली

0
66caecc5-35cd-4cce-bfef-5148d42d1457_1779684420911.jpg




“मी माझ्या सख्ख्या भावाला मारून त्याचा खून केला आहे’, असा एक खळबळजनक संदेश रविवारी, २४ मे २०२६ रोजी पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला. या फोन कॉलने पोलीस दलात एकच खळबळ उडवून दिली. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच पोलीस स्टेशनच्या बीट मार्शलने तातडीने हिवरीनगर झोपडपट्टी परिसरात धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना धक्कादायक वास्तवाचा सामना करावा लागला. नियंत्रण कक्षाला फोन करणारा इसम दुसरा कोणी नसून स्वतः खुनाची कबुली देणारा आरोपी भाऊच होता. मजुरीच्या ५,५०० रुपयांवरून वाद पेटला प्राथमिक माहितीनुसार, हिवरीनगर झोपडपट्टीत राहणारे भगवान गोविंदराव बाबुळे (वय ४२ वर्षे) आणि त्याचा लहान भाऊ प्रदीप गोविंदराव बाबुळे (वय ३९ वर्षे) हे दोघेही फर्निचर कामगार म्हणून काम करत होते. मृतक प्रदीप याच्याकडे मजुरीचे सुमारे ५,५०० रुपये होते. या रकमेच्या देवाणघेवाणीवरून रविवारी दोघा भावांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी भगवान याचा स्वतःवरील ताबा सुटला. त्याने घरात उपलब्ध असलेली लोखंडी टॉमी (लोखंडी साधन) उचलून प्रदीपवर सपासप वार केले. या भीषण मारहाणीत प्रदीपचा जागीच मृत्यू झाला. अंगणात पडला होता मृतदेह बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा घराच्या अंगणात प्रदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. स्वतः नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या भगवान बाबुळे याने पोलिसांना घटनास्थळी प्रदीपचा मृतदेह दाखवून तो त्याचा सख्खा भाऊ असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्वरित घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याचे घटनास्थळ सुरक्षित केले आहे. स्वतःहून गुन्ह्याची कबुली आरोपीने सख्ख्या भावाचा खून केल्यानंतर पळून न जाता, स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून “मी माझ्या भावाचा खून केला आहे’, अशी कबुली दिली आणि पोलिसांची वाट पाहत घटनास्थळीच थांबून राहिला. पोलीस स्टेशनचे अभिलेख आणि स्थानिक चौकशी केली असता, मृत आणि आरोपी या दोन्ही भावांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे समोर आले आहे. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध साधी एनसी (अदखलपात्र गुन्हा) किंवा तक्रारही नोंद नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed