पर्यावरण संवर्धनासाठी पाऊल:नगरमध्ये शासकीय अधिकारी अन् कर्मचाऱ्यांनी पाळला "नो व्हेईकल डे', अधिकारी-कर्मचारी सायकलने अन् पायी कार्यालयात‎

0
253_17794489576a103c7dc08cc_6373.jpg




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत व पर्यावरण संरक्षणाच्या आवाहनाला आणि राज्य शासनाच्या हरित उपक्रमांना प्रतिसाद देत, अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवारी अनोखा “नो व्हेईकल डे” उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबल्याचे पाहायला मिळाले. प्रदूषण मुक्तीचा संदेश देत अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सायकल, इलेक्ट्रिक वाहने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पब्लिक ट्रान्सपोर्ट) तसेच पायी कार्यालयात पोहोचले. या उपक्रमात अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कर्मचाऱ्यांसमोर आदर्श ठेवला. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते आणि जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक सुरेश आघाव हे स्वतः सायकल चालवत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तर उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, गौरी सावंत, तहसीलदार शोभा पुजारी व तहसीलदार संचेती यांनी खासगी वाहने घरीच ठेवून सार्वजनिक बसचा वापर केला आणि त्यानंतर कार्यालयात पायी चालत जात हजेरी लावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या कृतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. कार्यालयात सायकल व पायी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना (महाराष्ट्र राज्य शाखा, अहिल्यानगर) आणि महसूल संघटनेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय कर्मचाऱ्यांचा दैनंदिन कामाचा ताणतणाव कमी करण्यासाठी संघटनांच्या वतीने आता दर महिन्याला सायकल रॅली, ट्रेकिंग, योग, ध्यानधारणा आणि सुदर्शन क्रिया सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. ‘एक कर्मचारी – एक वृक्ष दत्तक’ योजना केवळ इंधन बचतच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनासाठी यावेळी “एक कर्मचारी – एक वृक्ष दत्तक” ही संकल्पना मांडण्यात आली. नावाला वृक्षारोपण न करता, लावलेले प्रत्येक झाड जगवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्याने स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले. शासकीय कार्यालय परिसर प्लास्टिकमुक्तीसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed