फुलंब्री तालुक्यात डिझेलचा तुटवडा, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा:मशागतीच्या वेळेस ट्रॅक्टरची चाके रुतली, पाणीपुरवठाही विस्कळीत‎

0
240_17794518256a1047b135f2d_89712313394.jpg




फुलंब्री तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. तालुक्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर ‘डिझेल संपले’चे फलक झळकत आहेत. ज्या मोजक्या पंपांवर साठा शिल्लक आहे, तिथे वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे वेगाने सुरू आहेत. शेतकरी राजा पेरणीपूर्व मशागतीसाठी सज्ज झाला आहे. मात्र, ऐन गरजेच्या वेळेसच डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर चालवायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. डिझेलअभावी शेकडो ट्रॅक्टर पंपांवर उभे आहेत. काहींनी थेट शेतातच उभे करून ठेवले आहेत. वेळेत मशागत न झाल्यास पुढील पेरण्या लांबण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हताश होऊन तासन्तास पंपाबाहेर रांगेत उभे असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. यामुळे वाहनधारक आणि पंपचालक यांच्यात तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार वादावादीचे प्रसंग घडत आहेत. यामुळे पेट्रोल पंपांवर कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. फुलंब्री तालुक्यातील या डिझेल टंचाईमुळे शेतकरी, टँकर चालक आणि व्यापारी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घ्यावी. डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा. अशी मागणी आता फुलंब्री तालुक्यातील जनतेकडून केली जात आहे. तालुक्यात अनेक पंपावर इंधनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. उन्हाच्या तीव्रतेत पाणीपुरवठा ठप्प; नागरिक संकटात या डिझेल टंचाईचा थेट फटका ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याला बसला आहे. तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय व खाजगी टँकरला डिझेल मिळेनासे झाले आहे. परिणामी, टँकरच्या फेऱ्या अनेक गावांत पूर्णपणे बंद असून, गावागावांत पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे मे महिन्यातील उन्हाची तीव्र झळ आणि दुसरीकडे डिझेलअभावी पाणी बंद, अशा दुहेरी संकटात तालुक्यातील नागरिक सापडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed