हनुमंतवाडीहून दिव्य मराठीचा ग्राउंड रिपोर्ट:मोटेगावकरने गावाशी संपर्क तोडला; त्याच्या अटकेचे काडीचेही दुःख नाही, मोटेगावकरच्या गावातील लोकांचा संताप
![]()
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातलं हनुमंतवाडी हे एक छोटंसं गाव. एरवी शांत असलेलं हे गाव आज एका वेगळ्याच अस्वस्थतेने वेढलेलं होतं. कारण, याच गावचं नाव लावून स्वतःला ‘शिक्षणमहर्षी’ म्हणवून घेणारा प्रा. शिवराज मोटेगावकर आज सीबीआयच्या कोठडीत आहे. देशभरातील २२ लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात केल्याचा, नीटचा पेपर फोडल्याचा डाग त्याच्यावर लागलाय. या पार्श्वभूमीवर, गावात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ची टीम शुक्रवारी सकाळी थेट हनुमंतवाडीत पोहोचली. सकाळचे साडेअकरा वाजले होते. ऊन तापायला लागलं होतं, पण हनुमंतवाडी वस्तीवर मात्र एक भयाण शांतता पसरली होती. गावात मोजकेच नागरिक मान्सूनपूर्व कामात व्यग्र होते. एरवी आपल्या गावातील माणूस मोठा झाला की गावाला अभिमान वाटतो, पण इथे चित्र उलट होतं. मोटेगावकरचं नाव काढताच गावकरी चार हात लांब पळत होते. ‘जशी करणी, तशी भरणी’ आम्ही मोटेगावकर याच्या भावकीतील मीराबाई मोटेगावकर यांच्यापर्यंत पोहोचलो. सुरुवातीला त्यांनी या प्रकरणाला ‘राजकारणा’चा रंग असल्याचं सांगून बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण, जेव्हा गावातील वास्तव समोर आले, तेव्हा त्यांनीही हताशपणे हात जोडत कर्माचा सिद्धांत मान्य केला. त्या म्हणाल्या, “ज्याचे कर्म त्याच्या पाठीशी… मोटेगावकरच्या कर्माची फळे त्यांना मिळतील.” स्वतःच्याच रक्ताच्या माणसांच्या प्रतिक्रियेतून मोटेगावकराबद्दलचा रोष स्पष्ट होतो. वस्तीत ८५ घरांची दुरवस्था तांडा वस्तीतील ८५ घरांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ८०% नागरिकांचा उदरनिर्वाह आजही केवळ मजुरीवर आणि ऊसतोडीवर अवलंबून आहे. पैशांचा महापूर वाहणाऱ्या मोटगावकरच्या गावातील गरीब मात्र मजुरीच्या गर्तेतच अडकून आहेत. मोटेगावकरची गावाच्या बाहेर शेती, तिथेच एक घरदेखील “मोटेगावकर गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या मूळ गावात फिरकलेलेदेखील नाहीत. ते लातूरलाच स्थायिक झाले. ते कुठे राहतात, काय करतात आणि काय काळेबेरे करतात, याबद्दल खुद्द आम्हालाच संशय होता.’ गावाच्या बाहेर त्यांची शेती आणि तिथेच एक घर आहे. पण त्या घरातही कोणी राहत नाही. कधी आलेच, तर ते दुरूनच निघून जातात, गावात पाऊलही टाकत नाहीत. त्यामुळे गावाशी त्यांचा संपर्क कधीच तुटला होता. गावातील मुलांच्या शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष शिवराज मोटेगावकर हे नाव लातूर पॅटर्नच्या माध्यमातून देशभरात कोट्यवधी रुपये कमावण्यासाठी आणि डॉक्टर-इंजिनिअर घडवण्यासाठी ओळखलं जातं. पण, त्यांच्या स्वतःच्या गावातील जिल्हा परिषदेची शाळा मात्र पूर्णपणे पडीक आणि भकास अवस्थेत आढळून आली. स्वतःच्या गावातील मुलांच्या हक्काच्या मोफत शिक्षणाकडे मोटेगावकरने पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे या सरकारी शाळेला आज मरणकळा आली आहे. जी शाळा गावाचं भविष्य घडवणार होती, ती आज पोरकी झाली आहे. हनुमंतवाडीत पाऊल टाकल्यावर तिथली सामाजिक आणि आर्थिक विषमता डोळ्यात खुपण्यासारखी आहे. गावाची विभागणी तीन तुकड्यांमध्ये झाली आहे. अटकेचा खेद नाही दुपार ढळत आली होती. वस्तीवर बसलेले निवृत्ती गुणाले हे ज्येष्ठ नागरिक अत्यंत स्पष्ट शब्दांत म्हणाले: “आम्हाला मोटेगावकरच्या अटकेचे काहीच दुःख वाटत नाही. शिवराज मोटेगावकर याचा गावाशी फारसा संपर्क नव्हता. ते आता लातूरचे झाले आहेत, त्यामुळे ते आमच्या गावाचे आहेत असं आम्हाला वाटतच नाही. आता त्यांना अटक झालीय हे कळतंय, पण त्याचा गावातील कुणालाही खेद नाही.’
