ठाण्यात मध्यरात्री अग्नितांडव:भाजी मार्केटला आग; जीव वाचवताना अग्निशमन जवानासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

0
deax1qryoj-6pcig-ezgifcom-resize_1779337632.gif




ठाण्यातील नौपाडा परिसरातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये बुधवारी पहाटे भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. गोखले रोडवरील गावदेवी प्रभाग समिती कार्यालयाजवळ असलेल्या या मार्केटमध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग भडकली आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराने वेढला गेला. आग इतकी भीषण होती की, घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या, जम्बो वॉटर टँकर, रेस्क्यू वाहने आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक काळू शंकर गाडेकर आणि अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी सागर शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला. दोघेही बचाव आणि नियंत्रण मोहिमेत सहभागी झाले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, धुराचे प्रचंड लोट आणि आगीची तीव्रता यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. जखमींना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, मृत्यू झालेल्या दोघांनाही गंभीर भाजल्याने जीव गमवावा लागला. दरम्यान, या दुर्घटनेत आणखी दोन अग्निशमन कर्मचारी जखमी झाले आहेत. सुजित पष्टे आणि समीर जाधव अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान धुरामुळे आणि उष्णतेमुळे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, दोन रेस्क्यू वाहनं, पाण्याचे टँकर आणि आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. आग नियंत्रणात आणण्यासाठी अनेक तास प्रयत्न सुरू होते. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पहाटे 3.43 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर काही मिनिटांतच सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. गावदेवी भाजी मार्केट इमारतीत मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्याने आग वेगाने पसरल्याचे सांगितले जात आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव परिसर बंद करण्यात आला होता आणि नागरिकांना दूर ठेवण्यात आले. अग्निशमन विभागातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ या घटनेनंतर ठाणे शहरात शोककळा पसरली आहे. विशेषतः बचावकार्य करताना अग्निशमन विभागातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किट किंवा इतर तांत्रिक कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून घटनास्थळी पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू असून या दुर्घटनेमुळे शहरातील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed