अवैध वाळू वाहतुकीने नागरिक त्रस्त; प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी
नांदेड जिल्ह्यातील गंगाबेट, वाहेगाव, भणगी, पिंपळगाव, मार्कंड, कल्हाळ, खुपसरवाडी, जिजाऊ नगर आदी परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक आणि डंपर भरधाव वेगाने धावत असल्याने रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या वाहनांचा वेग ८० किमीपेक्षा अधिक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहन चालकांना जाब विचारल्यास “गाडीचा फुल इन्शुरन्स आहे” अशी उर्मट उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मार्कंड रोड ते खरबी मार्गावरील कच्च्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रात्री अवैध वाहतूक सुरू असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. रोज कोण ना कोण नागरिक या वाहतुकीचा त्रास सहन करत असून अनेकांना कट बसणे, धडक लागणे किंवा भीतीच्या वातावरणात प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
या परिस्थितीमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून “हा अन्याय थांबला पाहिजे” अशी जोरदार मागणी केली जात आहे. नागरिकांनी नांदेड जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई करून अवैध वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
