गैरसोय:फुलंब्रीमध्ये मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेलाही मिळाले नाही इंधन, नातेवाइकांवर रस्त्यावरील वाहनांकडून डिझेल मागण्याची वेळ
![]()
ग्रामीण भागात सध्या जाणवत असलेल्या तीव्र डिझेल टंचाईचा फटका अत्यावश्यक सेवेला बसला असून, मध्यरात्री डिझेलअभावी मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पेट्रोल पंपावरच अडकून पडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगे येथील रहिवासी आरेफा शेख हसन (५७) या फुलंब्री येथे राहणारा आपला मुलगा खाजू शेख हसन याला भेटण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, फुलंब्रीत असतानाच त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर नातेवाइकांनी आरेफा शेख हसन यांचा मृतदेह मूळ गावात नेण्यासाठी महात्मा फुले रुग्णवाहिकेची (एमएच २०, सीटी ८२९१) व्यवस्था केली. रुग्णवाहिकेत थोडेच डिझेल होते. मात्र, रस्त्यातील पंपावर डिझेल भरून घेऊ, या आशेने रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी मृतदेह घेऊन रांजणगावकडे निघाले. रात्री १२ च्या सुमारास फुलंब्री येथील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील देशमुख (एच.पी.) पेट्रोल पंपावर रुग्णवाहिका डिझेल भरण्यासाठी थांबली. मात्र, पंपचालकांनी डिझेल संपल्याचे सांगत हात वर केले. रुग्णवाहिकेत पुढील प्रवासासाठी इंधनच नसल्याने, मृतदेह असलेली रुग्णवाहिका मध्यरात्री पंपावरच अडकली. शासनाच्या कडक नियमांनुसार रुग्णवाहिका, पोलिस वाहने आणि अग्निशमन दल यांसारख्या अत्यावश्यक व आपत्कालीन सेवांसाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधनाचा स्वतंत्र राखीव साठा ठेवणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. असे असतानाही फुलंब्रीत रुग्णवाहिकेला डिझेल नाकारले गेल्याने प्रशासकीय नियमांचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर प्रकारामुळे फुलंब्री शहर आणि परिसरात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नातेवाइकांचे डिझेलसाठी रात्री रस्त्यावर हातवारे हृदयविकाराने स्वकीय गमावल्याचे दुःख पदरात असतानाच, मध्यरात्री मृतदेह रस्त्यावर अडकून पडल्याने नातेवाइकांवर आभाळ कोसळले. रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी नातेवाईक आणि त्यांच्या मदतीला धावून आलेल्या स्थानिक नागरिकांनी मध्यरात्री रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला. थोडे डिझेल द्या म्हणून चालकांकडे याचना करण्याची कटू वेळ मृताच्या नातेवाइकांवर आली होती. रात्री उशिरापर्यंत हा मदतीसाठीचा संघर्ष सुरू होता. रुग्णवाहिकेसाठी सुरक्षित डिझेलचा स्टॉक ठेवणे गरजेचे Ãफुलंब्री शहरातून मृतदेह पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगे येथे घेऊन जात असताना आम्ही देशमुख पेट्रोल पंपावर थांबलो. मात्र, संबंधित पेट्रोल पंपचालकांनी डिझेल नसल्याचे सांगितले. त्यामुळे रुग्णवाहिका जागेवरच थांबवावी लागली. प्रशासनाने रुग्णवाहिकेसाठी सुरक्षित डिझेलचा स्टॉक ठेवणे गरजेचे आहे. -विजय देवमाळी, रुग्णवाहिका चालक, फुलंब्री
