मेळघाटातील ८३ पैकी ७९ शिक्षकांना नवी पदस्थापना:माध्यमिक शिक्षकांचे समायोजनही पूर्ण
![]()
अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांची पदस्थापना आणि अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली. डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या या प्रक्रियेत ८३ पैकी ७९ पात्र शिक्षकांनी नवीन पदस्थापना स्वीकारली, तर चार शिक्षकांनी ती नाकारली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. उच्च न्यायालयाने सातव्या टप्प्यातील २०२४ च्या अवघड क्षेत्रातील बदल्यांची यादी रद्द केल्याने, रिक्त पदांनुसार ही पदस्थापना देण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयानुसार, मेळघाट क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांना बिगर आदिवासी क्षेत्रात समुपदेशनाद्वारे पदस्थापना मिळाली. याव्यतिरिक्त, माध्यमिक शाळांमधील २०२५-२०२६ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजनही समुपदेशनाद्वारे पारदर्शकपणे करण्यात आले. यामध्ये एक पर्यवेक्षक, नववी ते दहावीचे भाषा विषयाचे (इंग्रजी/मराठी) पाच शिक्षक, विज्ञान विषयाचा एक, गणित विषयाचे तीन, सामाजिक शास्त्र विषयाचा एक शिक्षक, तसेच सहावी ते आठवीमधील विज्ञान-गणित विषयाचे तीन शिक्षक यांचा समावेश होता. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सतीश मुगल उपस्थित होते. उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने, अधीक्षक नरेंद्र गायकवाड, सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय मुंद्रे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने व चंद्रशेखर टेकाडे, तसेच वरिष्ठ सहाय्यक विजय मालोकार, हेमंतकुमार यावले, शरद चहाकार, सुदर्शन भोसले, अंकुश पवार, विश्वनाथ तपासे, अनिकेत हुरडे आणि श्याम देशमुख यांनी ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
