पुणे महापालिकेत ७१ स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचा आरोप:'पगार इथे, काम तिथे' प्रकाराबाबत चौकशीचे आदेश
![]()
पुणे महापालिकेत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता बहिरट यांनी ७१ स्वच्छता कर्मचारी ‘पगार एका ठिकाणाहून, काम दुसऱ्या ठिकाणी’ करत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या मुख्य सभेत बहिरट यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतील ७१ स्वच्छता कर्मचाऱ्यांची यादी सादर केली. या कर्मचाऱ्यांचा पगार घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातून होत असताना, ते प्रत्यक्षात इतर क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. बहिरट यांच्या म्हणण्यानुसार, घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने अनेक भागात अस्वच्छता पसरली आहे. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण दिले जात असताना, अनेक कर्मचारी इतरत्र कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त ताण येत असून, अनेक साफसफाई हद्दी दुर्लक्षित राहत आहेत. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांना इतरत्र काम करण्याची परवानगी कोणी दिली, कोणत्या कारणासाठी दिली, परवानगी नसल्यास काय कारवाई होणार, तसेच बदली कर्मचाऱ्यांची नियुक्ती का करण्यात आली नाही, असे प्रश्नही बहिरट यांनी उपस्थित केले. या आरोपांवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मुख्य सभेत मांडलेल्या मुद्द्याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच इतर क्षेत्रीय कार्यालयांतही असे प्रकार घडत आहेत का, याचीही माहिती घेतली जाईल. अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.”
