112 ठरतोय ‘लाइफलाइन’; वर्षभरात 45 हजार कॉल:मदतीसाठी पोलिसांची अवघ्या 9 मिनिटांत एन्ट्री: महिला सुरक्षा आणि क्राईमच्या तक्रारीत सर्वाधिक वाढ
![]()
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी गृह विभागाने सुरू केलेली ‘११२’ ही आपत्कालीन सेवा आता खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी ठरत आहे. गेल्या एका वर्षात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या या हेल्पलाईनवर तब्बल ४५,४०० फोन आले असून, त्यामध्ये महिला सुरक्षा आणि गुन्हेगारी संदर्भातील तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ४५,४०० कॉल्सपैकी मोठा हिस्सा हा महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार आणि छेडछाडीच्या तक्रारींचा होता. महिलांच्या सुरक्षेसाठी ही सेवा अत्यंत प्रभावी ठरत असून, संकटसमयी साद घातल्यास पोलीस अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल होत आहेत. महिलांच्या बरोबरीनेच चोरी, हाणामारी आणि इतर गंभीर गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी नागरिकांनी या क्रमांकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. नागरिकांनी खोटे अथवा विनाकारण कॉल करून सेवेचा गैरवापर करू नये ^जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन घटना, अपघात, महिलांवरील अत्याचार, मारामारी अथवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा. ही सेवा २४×७ कार्यरत असून सोलापूर ग्रामीण पोलीस सदैव तत्पर आहे. नागरिकांनी खोटे अथवा विनाकारण कॉल करून सेवेचा गैरवापर करू नये. – अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर. ९ मिनिटांत मिळतो मदतीचा हात आधुनिक तंत्रज्ञानामुळे शहरी भागात पोलिसांचा प्रतिसाद वेळ (रिस्पॉन्स टाइम) आता ७ ते ९ मिनिटांपर्यंत खाली आला आहे. प्रत्येक पोलीस गाडीमध्ये जीपीएस यंत्रणा असल्याने, नियंत्रण कक्षाला सर्वात जवळ असलेले वाहन घटनास्थळी त्वरित पाठवणे शक्य झाले आहे. ग्रामीण भागातही १० मिनिटांत मदत पोहोचवली जात आहे. ही सेवा २४×७ कार्यरत असून सोलापूर ग्रामीण पोलीस सदैव तत्पर आहे. नागरिकांनी खोटे अथवा विनाकारण कॉल करून सेवेचा गैरवापर करू नये. विशेष म्हणजे, फोन कट झाला तरी पोलीस स्वतः ‘कॉल बॅक’ करून परिस्थितीची खातरजमा करतात.
