संदूक…आठवणींचे ! डॉ. श्रीराम लागू सरांची पहिली भेट

0
5-1576604449.jpg


क महान कलावंत आणि प्रखर सामाजिक भान असणारे व्यक्तित्व म्हणून सरांबद्दल कमालीचा आदर होता,आहे.
लहानपणापासून वाचनाचे अफाट वेड… त्यामुळे डॉ.लागू सरांनी अजरामर केलेली बहुतांश नाटके वाचून झालेली.वृत्तपत्रातून आणि चित्रपटातून त्यांच्या अभिनयाच्या होणाऱ्या दर्शनावर मी तेवढा खुष नव्हतो. मला लहानपणी सिनेस्टार व्हायची स्वप्नं पडायची,तोच ध्यास होता.
तेव्हा समाज माध्यम तर सोडाच पण लँडलाइन फोन बघणे हीसुद्धा चैन होती.
अभिनयातील ह्या  नटसम्राटाला कधी एकदा भेटू असं झालेलं.
त्याकाळी नांदेडला कलामंदिर येथे प्रभाकरराव गादेवार प्रसिद्ध नाटके आणत. एके दिवशी वृत्तपत्र जाहिरातीतून कळालं डॉ. लागू सरांचे नाटक येणार. चौकशी केली. तिकीट दर खूप होते.मी तेंव्हा उमरीला.वय १७,१८ वर्षे.पण बालपणापासूनची सवय… एकदा ठरवलं की झालंच पाहिजे !
तेंव्हा अजंठा आणि एलोरा अशा दोन एक्सप्रेस नांदेडला जायच्या. संध्याकाळी नांदेडला पोचलो.इच्छुकांच्या गर्दीतून मार्ग काढत तिकीट मिळवले.पहिली फेरी जिंकलो होतो. मनात अनामिक धडधड वाढली. रंगमंदिरात गेलो.
गो. पु.देशपांडे ह्या प्रख्यात लेखकाचं राजकीय नाटक उद्ध्वस्त धर्मशाळा.
नाटक बघणाऱ्यांमध्ये सर्वात लहान मीच.त्यामुळे बावरलेला.पण नाट्य आकलन हा छंद.त्यामुळे लेखन,अभिनय, दिग्दर्शन सर्व पातळीवर नाटक कळत होतं, आवडत होतं. सरांचा अभिनय तर तुफान !
मध्यंतर झालं. आणि मी हातात डायरी घेऊन ग्रीन रुममध्ये. अनेकांनी अडवलं.पण मी थेट डॉ.लागू नावाच्या वादळी अभिनेत्यासमोर… डोळ्यात त्यांना साठवत होतो. राजबिंडे रूप,भेदक घारे डोळे,आवाज तर जगप्रसिद्ध.
” सर, मी एक छोटा कलावंत आहे.प्लीज तुमची स्वाक्षरी द्या ना.”
प्रारंभी त्यांनी वेळेमुळे टाळले.पण मी इरेला पेटलेला.
” सर, खास उमरिहून घरच्यांना न सांगता आलोय…केवळ तुमच्या प्रेमापोटी.प्लीज स्वाक्षरी द्या ना.”
सर मंदपणे हसले. त्यांनी झोकदार सही आणि शुभेच्छा दिल्या.” असं घरच्यांना न सांगता कुठे जायचं नाही.”
” तिकीट कोणतं काढलस ? ” मी सांगितलं.
ते कुणालातरी म्हणाले,” शक्य असेल तर ह्या मुलाला पुढे बसवा.”
आणि ते गडबडीने पुढील अंकाच्या तयारीला लागले.
ती सही बघत आणि डायरी काळजाला लावत मी बाहेर प्रेक्षागृहात आलो.
नाटक संपेपर्यंत मी ती स्वाक्षरी कितीतरी वेळा बघत होतो.जणू सोन्याचा हंडा मला सापडलाय.
दुसऱ्या दिवशी वर्गमित्र आणि मैत्रिणींना ती स्वाक्षरी दाखवत होतो आणि ते डोळे विस्फारून बघत होते.त्या दिवशी मी चर्चेचा विषय बनलो होतो.
आज एका क्लिकवर आपल्या आवडत्या स्टारला फोन, ईमेल आदी मार्गाने भेटू शकणाऱ्या पिढीला त्या जवळपास तीस वर्षांपूर्वीच्या आजही डायरीतील कागदावर झोकात उभ्या असणाऱ्या सहीचं मोल किती वाटेल माहीत नाही.
पण,मी पहिल्याच पायरीवर अभिनयाच्या हिमालयाच्या कुशीत शिरलो होतो…आणि २००६ ला ह्याच हिमालयाने माझ्या पहिल्याच एकांकिका संग्रहाला आपला ऐतिहासिक आणि अविस्मरणीय अभिप्राय द्यावा याचं नातं त्या सहित दडलं आहे हे फक्त आम्हा दोघांनाच माहीत असणारं गोड गुपित !
✍️
डॉ. विलासराज भद्रे,नांदेड
Mob : 9890145726.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed