NEET स्कॅम:बीडमध्ये पी. व्ही. कुलकर्णीच्या टोलेजंग इमारतीचे बांधकाम; वडिलोपार्जित घर पाडून उभारतोय 30 सदनिका
![]()
देशभर गाजणाऱ्या ‘नीट’ पेपर फुटीतील संशयित आरोपी प्रा. पी.व्ही. कुलकर्णी याने बीडमध्ये एका पाच मजली इमारतीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी सुरू केले असल्याचे समजते. शाहूनगर भागात कुलकर्णीचे वडिलोपार्जित घर होते. त्या जागेवर ही इमारत उभी राहतेय. या इमारतीमध्ये एकूण 30 सदनिका बांधण्यात येत आहेत. सध्या दुसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे. हे बांधकाम करताना नगर परिषदेचे नियम धाब्यावर बसवले असल्याचे समजते. बीडमधील इमारत बांधताना रस्त्यापासून नियमानुसार अंतर सोडले नाही. बिल्डिंगचे पिलर चक्क रस्त्याला खेटून उभे आहेत. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होऊ शकते. बीड नगर परिषदेच्या नगररचना विभाग आणि बांधकाम विभागाने अशा प्लॅनला कशी काय मंजुरी दिली, याची चर्चा आता सुरू झाली आहे. महालक्ष्मी मंदिराला खेटून इमारत राहतेय उभी बीडमधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी देवीच्या मंदिराला खेटून कुलकर्णीची इमारत उभी राहतेय. नीट घोटाळ्यात त्याचे नाव येताच नागरिकांनी ही इमारत पाडावी, अशी मागणी नगर परिषद प्रशासनाकडे केल्याचे समजते. तर बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी या इमारतीचा प्रत्यक्ष जागेवर जावून पंचनामा करावा, असे आदेश बांधकाम आणि अतिक्रमण विभागाचा पथकाला दिलेत. नियमाचे उल्लंघन झाल्यास या इमारतीच्या बांधकामावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सोबतच मंदिराचे पावित्र्य जपू. बांधकामात अतिक्रमण झाल्यास कारवाई करू, असा इशाराही मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते. वडिलोपार्जित घर पाडून केले बांधकाम सुरू पी. व्ही. कुलकर्णी मूळचा बीड येथील रहिवासी आहे. त्याचे शाहूनगर भागात वडिलोपार्जित घर होते. ते घर पाडून त्याने इथे इमारत उभारणी सुरू केली आहे. कुलकर्णी लातूरच्या एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला होता. त्याचा लातूरमध्येही एक मोठा बंगला असल्याचे समजते. निवृत्तीनंतर कुलकर्णीने आपले बस्तान पुण्याला हलवले होते. तिथे सुद्धा त्याचे घर असल्याचे समजते. बीडमध्ये सुरू असलेल्या या बिल्डिंगच्या बांधकामात कुलकर्णीने काळा पैसा वापरल्याची चर्चा आहे. आता सीबीआयकडून नीट पेपरफुटीच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यातून हे सारे गौडबंगाल बाहेर येईलच. मात्र, तूर्तास तरी पुढे येणारे या लोकांचे एकेक कारनामे लोकांना आश्चर्यचकित करीत आहेत. क्लासेसची जीवघेणी स्पर्धा, जाहिरातींना विद्यार्थी पडतात बळी शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या आई-वडिलांचे आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे आणि नामांकित कॉलेजमधून इंजिनिअर होऊन बाहेर पडावे हेच स्वप्न असते. त्यातूनच नीट, जेईई मेन्स, जेईई अॅडव्हान्सच्या क्लास चालकांचे फावले. त्यांच्यात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली. विद्यार्थ्यांचा आपल्याच क्लासकडे ओढा रहावा म्हणून खोट्या जाहिराती छापणे सुरू केले. त्यातूनच एकाच विद्यार्थ्याचे फोटो तीन-तीन चार-चार क्लासच्या जाहिरातीवर झळकू लागले. शिक्षणाची पंढरी म्हणून पुण्यानंतर लातूरकडे पाहिले जावू लागले. या जीवघेण्या स्पर्धेतून लातूरमध्ये काही वर्षांपूर्वी एका खासगी क्लासचालकाची गोळ्या झाडून हत्याही झाली होती. विशेष म्हणजे या प्रकरणी शिवराज मोटेगावर याचीही चौकशी झाली होती.
