पैठणचे उद्यान ४९ वर्षांसाठी देणार भाडेतत्त्वावर:२३२ हेक्टरवर होणार जागतिक पर्यटन प्रकल्प
![]()
जायकवाडी धरण परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला आहे. प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यान, ॲडव्हेंचर पार्क, डाउनस्ट्रीम भागाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकास केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २३२ हेक्टर क्षेत्र ४९ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या कराराद्वारे खासगी विकासकाकडे सोपवण्यात येणार आहे. जागतिक दर्जाचे जलपर्यटन व पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने नामांकित व अनुभवी पर्यटन विकासक, हॉटेल व रिसॉर्ट कंपन्या, ईपीसी कंत्राटदार, मोठे गुंतवणूकदार यांच्याकडून ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ प्रस्ताव मागवले आहेत. प्रकल्पांतर्गत उद्यानाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. यामध्ये थीम पार्क, जैवविविधता उद्यान, बटरफ्लाय गार्डन, सुसज्ज संगीत कारंजे, फूड प्लाझा, मुलांसाठी खेळ क्षेत्र, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य स्थळे विकसित केली जाणार आहेत. खासदार संदीपान भुमरे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर केला. या तून उद्यानाची प्राथमिक दुरुस्ती करून ते पर्यटकांसाठी पाच वर्षांनंतर सुरू केले. विकासकाला विस्तीर्ण २३२ एकरच्या अविकसित जागेवर हा नवीन प्रकल्प उभा करावा लागेल. जायकवाडी धरण परिसरात रिसॉर्ट््स, कॉटेजेस, नेचर रिट्रीट, वेलनेस झोन, पक्षी निरीक्षण केंद्र, निसर्गभ्रमण मार्ग, हस्तकला, जागतिक कीर्तीच्या पैठणी साडीचा अनुभव देणारे ‘पैठणी अनुभव केंद्र’ उभारण्यात येणार आहे. परिसरात डिजिटल तिकीट व्यवस्था, अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित राहील. हा प्रकल्प अजिंठा-वेरूळ, शिर्डी, शनी शिंगणापूर, पैठण या धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन साखळीशी जोडलेला आहे. शासनाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळेल. तसेच स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. “^जायकवाडी परिसरातील ज्या भागाचा विकास झालेला नाही, त्याच भागाचा खासगी सहभागातून कायापालट केला जाणार आहे. ४९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू आहे. – प्रशांत संत, कार्यकारी अभियंता १९७५ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त या उद्यानाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. काश्मीरमधील प्रसिद्ध शालिमार गार्डन, हरियाणातील पिंजोर गार्डन, म्हैसूर येथील वृंदावन गार्डनच्या धर्तीवर या उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. कोरोना काळ, प्रशासकीय अडचणी यांमुळे हे उद्यान सलग पाच वर्षे पूर्णपणे बंद होते. मात्र, गेल्या वर्षी हे उद्यान पुन्हा बहरले आहे. सध्या दररोज हजारो पर्यटक येथे भेट देत आहेत.
