माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची गुळतुला:अमरावतीत गरजू महिलांना शिवणयंत्रांचे, रुग्णांना फळांचे वाटप; वृद्धाश्रमात कुलर भेट

0
35790a9a-2e45-4dc2-8f7a-541f599daee4_1779025906156.jpg




अमरावती येथे माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे ‘गुळतुला’ करण्यात आली. या प्रसंगी गरजू महिलांना शिवणयंत्रांचे वाटपही करण्यात आले. हा कार्यक्रम स्थानिक गौरक्षण येथे काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला. ॲड. ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू व वंचित महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले आणि यशोमती ठाकूर यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत आणि मनपाचे विरोधी पक्षनेते तथा माजी महापौर विलास इंगोले यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तालुक्यात विविध उपक्रम माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तिवसा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि एनएसयूआय यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय आणि गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावन भूमीतील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वृद्धाश्रमातील वृद्ध माता-पित्यांना फळे आणि टॉवेलचे वाटप करण्यात आले. सध्याच्या तीव्र उन्हाळ्याचा विचार करून वृद्धांना दिलासा देण्यासाठी वृद्धाश्रमास कुलरही भेट देण्यात आला. यशोमती ठाकूर यांच्या जनसेवेचे व्रत पुढे नेण्याच्या उद्देशाने हे सामाजिक उपक्रम राबवण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव मेटकर, बाजार समितीचे सभापती रवि राऊत, नगराध्यक्ष प्रतिभाताई गौरखेडे, पणन महासंघाच्या संचालिका सुनिताताई अळसपुरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैभव वानखडे, नगरसेवक योगेश वानखडे, प्रफुल देशमुख, सेतुदादा देशमुख, माजी सभापती कल्पनाताई दिवे, अर्चनाताई भोंबे, जयश्रीताई वानखडे, पुनमताई काळमेघ, वैशालीताई सांभारे, किसनजी मुंदाने, सतीश पारधी, रितेश पांडव, लुकेश केने, प्रमोद वानखडे, राजू बोडखे, सतीश पोजगे, संदीप आमले, प्रणव गौरखेडे, गजानन भोंबे, सुनील बाखडे, प्रज्वल गुल्हाने, देविदास गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed