३० लाखांचा गुटखा जप्त; तेलंगणातील चालक पोलीस कोठडीत
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधित पानमसाला वाहतूक करणाऱ्या आरोपीला तब्बल ३० लाख ६३ हजार ६५० रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करीविरोधात पोलिसांनी मोठा प्रहार केला आहे.
याप्रकरणी रईस मोहम्मद अमेर मोहम्मद (वय ३१, व्यवसाय चालक, रा. शांतिनगर, जिल्हा आदिलाबाद, तेलंगणा) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना १६ मे रोजी सायंकाळी गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी गाडेगाव रोड–बोंढार बायपासमार्गे नांदेड शहरात येत असून, त्यामध्ये शासनबंदी असलेला गुटखा व पानमसाला विक्रीसाठी आणला जात आहे. माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी कांदा मार्केट चौक परिसरात सापळा रचला. दरम्यान, संशयित MH-37-T-3601 क्रमांकाच्या बोलेरो पिकअपला अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांना कट मारून भरधाव वेगाने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडवले आणि चालकाला ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शासनबंदी असलेला गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व सुगंधित पानमसाला आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात आर.के. क्लासिक पान मसाला, अलीबाबा प्रीमियम पान मसाला, एसआर-१ सुगंधित तंबाखू, एबी च्युइंग टोबॅको, पान सम्राट, राजनिवास, विमल पान मसाला, व्ही-१ टोबॅको, शेरशाह, झेडएल-०१ जर्दा, एसपी पान मसाला, राजा बाबू पान मसाला, सागर पान मसाला यांसह विविध ब्रँडचा माल आणि बोलेरो पिकअप वाहनाचा समावेश आहे. एकूण मुद्देमालाची किंमत ३०,६३,६५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोउपनिरीक्षक व्यंकट कुसमे व पोलीस अंमलदार मारोती पंचलिंग,शंकर माळगे,धम्मपाल कांबळे, यांनी सहभाग घेतला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोउपनिरीक्षक व्यंकट कुसमे करीत आहेत
