नीलम गोऱ्हेंनी पुण्यातील ग्रामदैवतांचे घेतले दर्शन:भ्रष्टाचारमुक्तीसाठी केली प्रार्थना, विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड

0
1e64d957-1c7a-459e-9885-29aa7f5ebd02_1779021271877.jpg




शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यपदी सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर त्यांनी रविवारी पुण्यातील ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत भ्रष्टाचारमुक्त शासनासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. त्यांनी श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्री दत्त मंदिरात विधिवत पूजा व आरती केली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, समाजात सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे काटकसरीने आणि जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. याच भूमिकेतून त्यांनी कार्यकर्त्यांसोवेत मर्यादित स्वरूपात हा दौरा आयोजित केला होता. त्यांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे नमूद केले. गरीब आणि सामान्य कुटुंबांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहिला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. शासनाने गरीब कुटुंबांना अधिकाधिक योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नीटसारख्या परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवर त्यांनी चिंता व्यक्त केली. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य आले असून, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. डॉ. गोऱ्हे यांनी कसबा गणपती चरणी प्रार्थना केली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारला भ्रष्टाचारमुक्त शासन करण्याची शक्ती मिळो. सामान्य लोकांच्या प्रश्नांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रभावी कायदा व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तरुणांना आवाहन करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, की काही अडचणी आल्या असल्या तरी त्यातून मार्ग नक्की निघेल. तरुणांनी खचून जाऊ नये. सर्व परीक्षांबाबत सरकार योग्य ती कारवाई करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दौऱ्यावेळी शिवसेना वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख प्रकाश ढमढेरे, शहर संघटक आनंद गोयल, पुणे शहर समन्वयक राजाभाऊ भिलारे, वडगाव शेरी विधानसभा प्रमुख हेमंत बत्ते, पुणे शहर सचिव संदीप शिंदे, झोपडपट्टी शहर प्रमुख राजू विटकर, महेंद्र जोशी, राहुल खैरे, सुधीर कुरुमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed