मुंबईसह अनेक जिल्ह्यांत भाजीपाला महागला!:हिरवी मिर्ची 150 रुपये, तर टोमॅटोसह पालेभाज्याही महाग; इंधन दरवाढीचा असाही फटका

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-15t170002250_1778844652.jpg




सध्या जागतिक राजकारणामुळे आणि सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्राइल युद्धामुळे याचा थेट फटका इंधनावर होत आहे. अनेक जहाजे इराणच्या होर्मुजच्या तिथे अडकल्या आहेत. त्यामुळे इतर देशांप्रमाणेच भारतालाही इंधन दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. आता इंधन दरवाढ झाल्याने याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या स्वयंपाकघरातही पाहायला मिळत आहे. गॅसची टंचाईसोबतच आता भाजीपालाही महागला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, नवीमुंबईसह महानगर क्षेत्रात भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी आवक 20 ते 30 टक्क्यांनी घटल्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर दिसून येत आहे. सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असून, आठवड्याभरापूर्वी 130-170 रुपयांच्या दरम्यान असलेले फ्रेंच बीन्स आता 200 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. हिरव्या मिरचीने 150 रुपयांची पातळी गाठली असून, टोमॅटोचे दरही 25 रुपयांवरून थेट दुपटीने वाढत 50-60 रुपयांवर गेले आहेत. कोथिंबिरीची जुडी 60 रुपयांना विकली जात आहे. यासोबतच फ्लॉवर आणि गवार यांसारख्या भाज्यांचे दरही 100 ते 160 रुपयांच्या घरात पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. डेअरी प्रोडक्टसवरही होणार परिणाम दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा थेट परिणाम हा दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या गोष्टींवर होतो. याचे कारण म्हणजे फळ आणि भाज्यांना शेतांमधून मंडीपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीची गरज असते आणि या वाहतुकीसाठी पेट्रोल आणि डिझेलची गरज असेट. आता इंधनच महागले म्हटल्यावर भाज्यांची किंमतही वाढणार. भाजीपाल्यांसोबतच दूध आणि इतर डेअरी प्रोडक्टसवरही याचा परिणाम होऊ शकतो. इथेही दुधाची वाहतूक आलीच, त्यामुळे थोडक्यात सांगायचे झाले तर सध्याच्या परिस्थितीचा फटका आता थेट आपल्या स्वयंपाकघरात जाणवायला लागला आहे. भाजीपाल्यांच्या किंमती वाढण्यामागे उन्हाचाही फटका गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. त्यामुळे उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. अनेक ठिकाणी पिके करपल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः कोथिंबीर, मेथी, पालक यांसारख्या पालेभाज्यांचे उत्पादन घटले आहे. याचा परिणाम बाजारात आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. पालेभाज्या महागल्या सोनगावच्या आठवडे बाजारात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून, कोथिंबिरीची जुडी 20 ते 40 रुपयांवर, तर टोमॅटोचे दर 40 ते 50 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. हिरवी मिरची, वांगी, भेंडी आणि काकडी यांसोबतच मेथी, चाकवत, शेपू, पालक व तांदुळशा यांसारख्या पालेभाज्यांचे भावही कडाडल्याने, भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी वाढत्या महागाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed