रामदासपेठेत 'हिट अँड रन':भरधाव कारने सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाचा घेतला बळी

0
ad8433a6-c375-47e9-bb93-55fb9c9d3cd8_1778834915877.jpg




नागपूर शहराच्या रामदासपेठ परिसरात शुक्रवारी पहाटे झालेल्या ‘हिट अँड रन’ अपघातात सायकलस्वार ज्येष्ठ नागरिक श्यामलाल मेढाई वर्मा (वय ७०) यांचा मृत्यू झाला. भरधाव वेगातील कारने धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. वर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून, नागपुरातील काछीपुरा येथे राहत होते आणि बागकाम करून उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे सायकलने कामावर जात असताना, रामदासपेठेतील वेस्ट कोर्ट इमारतीसमोरील श्रीमद रामचंद्र चौकात एका भरधाव कारने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक बाहेर आले. त्यांनी तात्काळ सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, अज्ञात कारचालकाविरोधात ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. रामदासपेठ, धरमपेठ आणि गोकुळपेठ यांसारख्या मध्यवर्ती परिसरात महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, रुग्णालये आणि व्यावसायिक आस्थापनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे या भागात वाहतुकीचा ताण आणि बेफाम वाहनचालकांची समस्या गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन आठवड्यांपूर्वीच धरमपेठ परिसरात योगासन वर्गासाठी निघालेल्या मंगला रामदासपंत केवटे (वय ७२) यांचाही भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एका ज्येष्ठाचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पहाटेच्या वेळेत शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवर वेगमर्यादेचे पालन होत नसल्याची तक्रार नागरिक सातत्याने करत आहेत. चौकांमध्ये सीसीटीव्ही, स्पीड मॉनिटरिंग, झेब्रा क्रॉसिंग आणि पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed