साताऱ्यात आजपासून हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचा थरार:देशभरातील नामांकित मल्ल साताऱ्यात दाखल; छत्रपती शाहू स्टेडियम सज्ज

0
730-x-548-new-2026-05-15t133455764_1778832348.jpg




सातारा शहरात आजपासून हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचा थरार रंगणार असून, देशभरातील नामांकित मल्ल, प्रशिक्षक आणि पंच मोठ्या संख्येने साताऱ्यात दाखल झाले आहेत. राष्ट्रीय कुस्तीगीर परिषद आणि राजेश्वर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पैलवान साहेबराव पवार यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कुस्ती सोहळ्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणाऱ्या या स्पर्धांसाठी अत्याधुनिक पद्धतीने तयारी करण्यात आली असून, मैदानासह प्रेक्षक गॅलरी, मल्लांच्या निवास व्यवस्था, पंचांसाठी स्वतंत्र सुविधा तसेच सुरक्षेची व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील विविध राज्यांतील मल्ल आज साताऱ्यात दाखल झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी आयोजकांनी विशेष नियोजन केले होते. स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर आज मल्लांची ओळख परेड, वजन नोंदणी प्रक्रिया तसेच पंचांच्या उपस्थितीची अधिकृत नोंदणी पार पडली. तब्बल तीनशे पंच या स्पर्धांचे परीक्षण आणि देखरेख करणार असून, त्यामुळे स्पर्धा अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. विविध वजनी गटांतील कुस्तीगीरांनी आज सराव सत्रात सहभाग घेतला. यावेळी तालीम संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पैलवान साहेबराव पवार यांनी छत्रपती शाहू स्टेडियमला भेट देत स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली. मैदानाची मांडणी, मातीची गुणवत्ता, स्पर्धकांसाठी करण्यात आलेल्या सुविधा तसेच पंचांच्या व्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली. यावेळी समन्वयक दीपक पवार आणि सुधीर नाना पवार उपस्थित होते. त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांच्या माध्यमातून व्यापक नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली. महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील मल्ल हिंदकेसरी स्पर्धांमध्ये देशातील अव्वल दर्जाचे मल्ल सहभागी होणार असल्याने कुस्तीप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील मल्ल या स्पर्धेत आपली ताकद आजमावणार आहेत. काही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले पैलवानही या सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. साताऱ्याची ऐतिहासिक कुस्ती परंपरा आणि शाहू महाराजांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, पुढील काही दिवस सातारा शहरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *