मुंबईत विकृतीचा कळस! विक्रोळीत 13 वर्षीय बालिकेवर बेकरी मालकाकडून अत्याचार:..तर चारकोप मेट्रो डेपोत महिला अभियंत्याचा विनयभंग
![]()
मुंबईतील विक्रोळी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पार्कसाईट परिसरात बेकरी चालवणाऱ्या एका नराधमाने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर 3 ते 4 वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी बेकरी मालक नफिस अहमद अब्दुल रहमान उर्फ सलमान याला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी आरोपीच्या बेकरीत खाऊ घेण्यासाठी जात होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने तिला बेकरीच्या मागील खोलीत नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्याने पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. सध्या पीडितेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मेट्रो अधिकाऱ्यांकडून महिलेचा विनयभंग महामुंबई मेट्रोच्या चारकोप डेपोमध्ये एका वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थापकाने कनिष्ठ महिला अभियंत्याचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मेट्रोमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत कार्यालयातच विनयभंग केल्याचा आरोप या 46 वर्षीय महिला अभियंत्याने केला आहे. या प्रकरणी चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेसोबत अश्लील चाळे पीडित महिला विरार येथील रहिवासी असून महामुंबई मेट्रो संचालन मर्यादित कंपनीत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे. मस्टर मंजुरीच्या कामानिमित्त ती सुरक्षा व्यवस्थापकाला भेटायला गेली असता, तुमचे काम मीच करून देऊ शकतो, असे म्हणत आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे केले. महिलेने प्रसंगावधान राखत तिथून सुटका करून घेतली आणि थेट महिला आयोग व कंपनीच्या अंतर्गत समितीकडे दाद मागितली. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी तक्रार केल्यानंतर पीडितेला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते, मात्र महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर तिला पुन्हा रुजू करून घेण्यात आले. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर चारकोप पोलिसांनी अखेर गुन्हा नोंदवला आहे. आरोपी सरकारी अधिकारी असल्याने त्याला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत पीडितेने थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांने कारवाई करावी.
