मोदींचा काटकसरीचा सल्ला अन् साताऱ्यात उधळपट्टी!:टीकेची झोड उठताच सरकारचा 'यू-टर्न'; 400 एसटी बसेसचे नियोजन रद्द
![]()
साताऱ्यात शुक्रवारी होणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी हेलिपॅड, लाभार्थ्यांसाठी 400 एसटी बसेस, हजारो फूड पॅकेट्स आणि पंखे, कुलरसाठी लाखोंची उधळपट्टी सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामविकास मंत्रालयाने तातडीने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच लाभार्थ्यांची संख्या कमी केली असल्याचे स्पष्टीकरण मंत्री जयकुमार गोरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आणि काटकसरीचे आवाहन देशवासीयांना केले आहे. असे असताना प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शुक्रवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू होती. त्यासंदर्भातील बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. खुद्द भाजप सरकारकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली गेली असल्याची टीका विरोधकांकडून सुरू झाली होती. तसेच सोशल मीडियावर देखील भाजपला ट्रोल करण्यात येत होतं. त्यामुळे ग्रामविकास मंत्रालयाने तातडीने कार्यक्रमाची व्याप्ती कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या. या कार्यक्रमासाठी 50 हजार लाभार्थ्यांना आणण्यासाठी 400 एसटी बसेस बुक करण्याचे प्रयत्न सुरू होते. आता केवळ 10 ते 15 हजार लाभार्थ्यांनाच आणण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे. तसेच लाभार्थी एसटीतूनच आणले जाणार असल्याने तो खर्चही शासनाच्याच तिजोरीत जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
