वाडीतील 400 मीटर रस्त्याचे काम वर्षभर रखडले:कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त, वाहतूक कोंडी
![]()
वाडी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या ऍटोमिक एनर्जी डेपो रोडवरील ४०० मीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम वर्षभरातही पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे आणि नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे स्थानिक रहिवासी, बँकांचे ग्राहक आणि शाळकरी मुले त्रस्त झाली आहेत. या अपूर्ण कामामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आमदार समीर मेघे यांच्या हस्ते ३० मे २०२५ रोजी या रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. मात्र, भूमिपूजनानंतर अनेक महिने कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली नाही. यामुळे नगरपरिषद निवडणुकीपूर्वीचा हा केवळ एक दिखावा होता का, अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. अखेर दिवाळीच्या सुमारास कामाला सुरुवात झाली, परंतु त्याची गती अत्यंत संथ होती. कधी चार दिवस काम चालायचे, तर कधी पंधरा दिवस ते बंद असायचे. होळीच्या काळात तर मजूर गावी गेल्याचे कारण देत कंत्राटदाराने महिनाभर काम थांबवले होते, ज्यामुळे कामात आणखी विलंब झाला. सिमेंट रस्त्याचे काम कसेबसे पूर्ण झाले असले तरी, नियमानुसार नालीचे काम अद्याप अपूर्ण आहे. सुमारे महिनाभरापूर्वी नालीचे काम सुरू झाले, परंतु केवळ २०० मीटर काम करून कंत्राटदाराने ते सोडून दिले. जुन्या डांबरी रस्त्यापेक्षा सिमेंट रस्त्याची उंची वाढल्याने आणि शेजारी उघडा नालीचा खड्डा असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. लाईफस्टाईल सोसायटी, लकी सोसायटी आणि वैयक्तिक रो-हाऊस मधील रहिवाशांना लाकडी पाटीचा आधार घेऊन ये-जा करावी लागत आहे. परिसरातील शाळेसमोरही बांधकाम साहित्य आणि खड्डे असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. लाईफस्टाईल सोसायटीसमोर गेल्या पंधरा दिवसांपासून बॅरिकेट्स लावून बांधकाम साहित्य तसेच ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे सुमारे २०० कुटुंबांची गैरसोय होत आहे. या परिसरात फेडरल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि आयडिया कंपनीचे मोठे कार्यालय आहे. नालीचे काम अपूर्ण असल्याने चारचाकी वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. परिणामी, सर्व वाहने सिमेंट रस्त्यावरच उभी केली जातात, ज्यामुळे रस्ता अरुंद होऊन दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे बँकेचे ग्राहक आणि कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ४०० मीटरच्या रस्त्यासाठी आणि नालीच्या कामासाठी एक वर्ष लागत असेल, तर फूटपाथचे काम कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
