डोकाडिया कुटुंब मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट:यकृत-मूत्रपिंड हिरवे पडल्याने विषबाधेचा संशय; चार मृत्यूंच्या रहस्यावर मोठा खुलासा
![]()
मुंबईतील पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला असून मृतांच्या यकृत आणि मूत्रपिंडांमध्ये हिरवट रंग आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचा रंग हा झिंक फॉस्फाईड विषबाधेचा महत्त्वाचा संकेत मानला जातो. त्यामुळे या मृत्यूमागे विषबाधेची शक्यता अधिक गडद झाली असून तपास यंत्रणांनी या अहवालाला अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. फॉरेन्सिक तपासात यापूर्वीच मृतांच्या शरीरात झिंक फॉस्फाईडचे अंश सापडले होते. आता हिस्टोपॅथॉलॉजी अहवालातूनही त्याला दुजोरा मिळाल्याने प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. झिंक फॉस्फाईड हे प्रामुख्याने उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी रसायन आहे. अशा प्रकारच्या विषबाधेमध्ये यकृत आणि मूत्रपिंडांमध्ये हिरवट बदल दिसून येतात, असे वैद्यकीय निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे चौघांच्या मृत्यूमागे अपघाती विषबाधा, आत्महत्या की नियोजित कट होता, याचा तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे. 26 एप्रिल रोजी डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा काही तासांच्या अंतरात मृत्यू झाला होता. त्याआधी रात्री कुटुंबीयांनी कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, पोटदुखी, चक्कर आणि अस्वस्थता जाणवू लागली होती. दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली. दोन मुली बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच प्रथम एका मुलीचा, त्यानंतर दुसऱ्या मुलीचा आणि काही वेळातच आई-वडिलांचाही मृत्यू झाला. या सलग मृत्यूंमुळे संपूर्ण मुंबई हादरली होती. घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अधिकाऱ्यांनी घरातील विविध खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या अर्ध्या कलिंगडाचे नमुने तपासणीसाठी जप्त केले होते. एफडीएच्या प्राथमिक तपासात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आढळली नाही. मात्र एफएसएलच्या अहवालात कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईड आढळल्याचे समोर आले. त्यामुळे कलिंगडातून विषबाधा झाली का, हा तपासाचा मुख्य मुद्दा बनला आहे. दरम्यान, या प्रकरणात नेमका कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करायचा याबाबत पोलिस अजूनही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र आता समोर येणाऱ्या वैज्ञानिक अहवालांमुळे हत्या, आत्महत्या किंवा निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू अशा सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. पोलिसांकडून विविध तज्ज्ञांचे मत घेतले जात असून या प्रकरणातील प्रत्येक बाब बारकाईने तपासली जात आहे. तज्ज्ञ डॉक्टर आता सर्व अहवालांचा अभ्यास करणार जेजे रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर आता सर्व अहवालांचा सखोल अभ्यास करणार आहेत. विषबाधा नेमकी कशामुळे झाली, तिचा शरीरावर किती वेगाने परिणाम झाला, मृतांच्या आरोग्यस्थितीचा त्यात काही संबंध होता का, तसेच मृत्यूची वैद्यकीय प्रक्रिया नेमकी कशी घडली, याचा अभ्यास केला जाणार आहे. या चौकशीनंतरच मृत्यूमागील खरी कारणे स्पष्ट होण्याची शक्यता असून डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
