साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा:जिल्हा रुग्णालयात झाडे कोसळली, वाहतूक विस्कळीत
![]()
सातारा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही भागांत गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, पशुधन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली असून प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे. तालुका सातारा येथील कोंडवे गावात विजेचा तडाखा बसून १८ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेंढपाळ हनुमंत मासाळ यांच्या मेंढ्यांवर अचानक वीज कोसळली. या घटनेत त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने, काही वेळापूर्वीच कागद आणण्यासाठी दुसरीकडे गेल्यामुळे हनुमंत मासाळ यांचा जीव वाचला. दरवर्षीप्रमाणे ते या परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आले होते. घटनेची माहिती मिळताच कोंडवे गावचे पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, अवकाळी पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयालाही बसला. शवविच्छेदनगृह परिसरात सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास दोन मोठी झाडे कोसळली. झाडे पडताच परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्याच्या पश्चिम भागातही दीड तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. ग्वाल्हेर–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग मंदावला होता. काही ठिकाणी वाहनचालकांना दिवे सुरू करून सावधगिरीने प्रवास करावा लागला. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी आवश्यक कारवाई तात्काळ करा –जिल्हाधिकारी संतोष पाटील. आजच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्राथमिक माहिती, मनुष्य व प्राणी हानी असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाला कळवावी. मदतीसाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत.
