भोंदू अशोक खरात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई:नामकर्ण आवारेला अटक, खरातच्या कबुलीनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
![]()
नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात प्रकरणी सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिवनिका संस्थानचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक महत्त्वाची मानली जात आहे. सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत अशोक खरातने उघडलेल्या 32 खात्यांना आवारेची सहमती असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच खरातच्या कबुलीनंतर सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक केली आहे. अशोक खरातला कालच सिन्नर पोलिसांनी अटक करून आज कोर्टात हजर केले होते. त्यात चौकशीत आवारेचे नाव पुढे आल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. नामकर्ण आवारे याने ‘असा मी नामकर्ण’ या पुस्तकात अशोक खरातची स्तुती करणारे प्रकरण लिहिल्याने आवारे चर्चेत आला होता. जगदंबा पतसंस्थेत तब्बल 32 बनावट खाती उघडून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अशोक खरातला आज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. या गैरव्यवहारातील पैशांचा मुख्य आर्थिक स्रोत कोणता, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने खरातला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरात याच्या तपासात एसआयटीने आपली कारवाई अधिक तीव्र केली असून, या तपासाचा भाग म्हणून गेल्या आठवड्यात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची तब्बल 6 तास कसून चौकशी करण्यात आली. एसआयटीने या प्रकरणातील विविध पैलू आणि घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चाकणकर यांचा जबाब नोंदवला असून, या मोठ्या कारवाईमुळे या प्रकरणातील तपासाला आता वेग आला आहे.
