पुण्यात तरुणीच्या प्रियकराकडून आईच्या प्रियकराचा खून:प्रेमसंबंधांच्या वादातून काळेपडळ पोलिसांनी सहा जणांना अटक केली
![]()
पुण्यात प्रेमसंबंधांच्या वादातून एका तरुणीच्या प्रियकराने तिच्या आईच्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली आहे. प्रेमसंबंध तोडण्यासाठी मृत व्यक्तीने टाकलेल्या दबावामुळे हा खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासह सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश संजू बिरादार (वय २५, रा. ससाणेनगर, हडपसर) असे आहे. या प्रकरणी दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर (वय २१, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता), पारस किशोर गायकवाड (वय २१, रा. दत्तवाडी, सिंहगड रस्ता), अभिजित उर्फ अभि संजय इंगळे (वय २२), सोमनाथ रमेश दोरकर (वय २१), साहिल सागर शेलार (वय २४, सर्व रा. हडपसर) आणि चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी दुर्वांग मानकर याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्वांग मानकर याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तर, मृत गणेश बिरादार याचे दुर्वांगच्या प्रेयसीच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. गणेश विवाहित होता. दुर्वांगची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने गणेशने तरुणीला त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. त्याने तरुणीवर दबाव आणला होता आणि तिच्या आईलाही याबाबत माहिती दिली होती. याच कारणावरून दुर्वांग आणि गणेश यांच्यात अनेकदा वाद झाले होते. ३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गणेश बिरादार हडपसरमधील ससाणेनगर भागात एका इमारतीच्या परिसरात थांबला होता. त्यावेळी आरोपी दुर्वांग आणि त्याचे साथीदार तिथे आले. त्यांनी गणेशला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी गणेशच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याला गंभीर जखमी केले आणि तेथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या गणेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली होती. पोलिसांनी सापळा रचून वेगवेगळ्या भागातून सर्व आरोपींना अटक केली. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सहायक निरीक्षक अमित शेटे, अजय हंचाटे, हवालदार प्रवीण काळभोर, नीलेश देसाई, प्रतीक लाहिगुडे, दाऊद सय्यद, परशुराम पिसे, राजू वाघमारे, शाहिद शेख, बालू ठाकूर, राकेश साळुंके आणि अतुल पंधरकर यांनी ही कारवाई केली.
