मलकापुरात गॅस सिलेंडरच्या स्फोटाने घर जळून खाक:85 वर्षीय वृद्धेचा आगीत होरपळून मृत्यू; अशोक नगर परिसरातील धक्कादायक घटना
![]()
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका घराला लागलेल्या आगीत 85 वर्षीय वृद्धेचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या स्फोटामुळे लागलेली आग इतकी भीषण होती की, बघता बघता संपूर्ण घर जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मलकापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील अशोक नगर परिसरात आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली. या आगीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने 85 वर्षीय नर्मदाबाई लासुरकर यांचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. पोलिसांनी या घटनेचा रीतसर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून, या हृदयद्रावक दुर्घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. बिबवेवाडीत मंडप साहित्याच्या गोदामाला भीषण आग पुणे शहरातील बिबवेवाडी भागातील अप्पर डेपो जवळ असलेल्या ‘काळे अँड सन्स’ या मंडप साहित्याच्या गोदामाला आज दुपारी 1 वाजून 23 मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली. ओसवाल दवाखान्यासमोर असलेल्या या सुमारे 8 हजार चौरस फुटांच्या विशाल गोदामात कार्पेट, कापड आणि सजावटीच्या साहित्याचा मोठा साठा होता. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते. गोदामाच्या आजूबाजूला दाट नागरी वस्ती आणि दुकाने असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, गोदामातील साहित्यासह तिथे उभा असलेला एक चारचाकी टेम्पो आणि सात दुचाकी वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाला नागरी वस्तीतून सतत फोन येत असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने चारही बाजूंनी पाण्याचा मारा करण्यात आला. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आग शेजारील घरांपर्यंत पोहोचली नाही आणि मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाची मोठी मोहीम मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये पुणे अग्निशमन दलाची 7 वाहने, 3 वॉटर टँकर, महापालिकेचे 11 टँकर आणि पुणे कॅन्टोन्मेंटचे 1 वाहन अशा मोठ्या ताफ्याचा वापर करण्यात आला. अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, समीर शेख, सुनील नाईक नवरे, कैलास शिंदे आणि जवळपास 50 जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून आगीवर नियंत्रण मिळवले. या कामगिरीत स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले.
