चोपड्यातील पंकज नगर भागात दीड महिन्यांपासून विजेचा लपंडाव:संतप्त नागरिकांनी अभियंत्यांना धरले धारेवर, बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा
![]()
चोपडा शहरातील पंकजनगर आणि परिसरातील नागरिक गेल्या दीड-दोन महिन्यांपासून विजेच्या भीषण समस्येमुळे मेटाकुटीला आले आहेत. ४५ अंशांच्या घरात पोहोचलेल्या तापमानात वारंवार वीज गुल होत असल्याने आणि विजेच्या दाबात (व्होल्टेज) कमालीची अनियमितता असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, आज संतप्त नागरिकांनी पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले आणि कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपकार्यकारी अभियंता संदीप महाजन यांना जाब विचारताना, “आमचा प्रश्न आजच सुटला नाही तर १३ मे पासून कार्यालयातच बिऱ्हाड मांडून खिचडी शिजवू,” असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला. पंकज नगर भागातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसा विजेचा दाब प्रचंड असतो, तर रात्री तो इतका कमी होतो की पंखे आणि एसी यांसारखी उपकरणे चालत नाहीत. या चढ-उतारामुळे अनेकांची महागडी घरगुती उपकरणे जळून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वीज नसल्यामुळे पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचेही गंभीर संकट उभे राहिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कमी दाबाने वीज पुरवठा होत असताना करंट वाढत असल्याने वीज बिलातही मोठी वाढ होत आहे, ज्यामुळे रहिवाशांना मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही त्रासांना सामोरे जावे लागत आहे. अधिकाऱ्यांची जबाबदारी झटकण्याची वृत्ती डॉ. सुरेश बोरोले यांनी उपकार्यकारी अभियंता संदीप महाजन यांना ठणकावून सांगितले की, “आपली जबाबदारी झटकू नका.” चोपडा शहरातील इतर भागांत, खेड्यापाड्यांत वीज सुरळीत असताना केवळ पंकज नगरवरच हा अन्याय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनीही महावितरणच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांतील हे दुसरे आंदोलन असून, २८ एप्रिल रोजी केलेल्या आंदोलनानंतरही महावितरणने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. पालकमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली तक्रार दोडे गुर्जर समाजाचे विश्वस्त डी. बी. पाटील यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग पाटील यांच्याशी संपर्क साधून ग्राहकांचे गाऱ्हाणे मांडले. या आंदोलनात प्रा. आर. बी. वाघजाळे, ऋषीदास बाविस्कर, विपीन बोरोले, ॲड. कुलदीप पाटील, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, दिपाली बोरोले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिवसभरात विजेचा प्रश्न सुटला नाही, तर १३ मे रोजी महिला आणि मुलाबाळांसह कार्यालयात मुक्काम ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्याच्या ‘बिऱ्हाड’ आंदोलनाकडे लक्ष “उद्या आम्ही आमच्या कुटुंबासह या कार्यालयावर येऊ आणि इथेच मुक्काम करून खिचडी टाकू, आपणही ती खायला या,” अशा शब्दांत एस. बी. पाटील यांनी प्रशासनाला आव्हान दिले आहे. त्यामुळे आता महावितरण तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन नागरिकांना दिलासा देते की उद्या कार्यालयावर ‘बिऱ्हाड’ मोर्चा धडकतो, याकडे संपूर्ण चोपडा शहराचे लक्ष लागले आहे.
