12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द:विधानसभा अध्यक्षांचा मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; अमित साटम यांच्याकडून मात्र हरताळ
![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे जनतेला इंधनाची काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मात्र मोदींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. कारण, त्यांच्या नालेसफाईची पाहणी करण्याच्या दौऱ्यात तब्बल 25 गाड्यांचा ताफा दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे आपण इंधनाचा जपून वापर केला पाहिजे. स्वयंपाकाचे तेल, पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचा कमी वापर केला पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य विधिमंडळाच्या 12 आमदारांचा जपान दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे. जपानच्या 2 राज्यांनी दिले होते निमंत्रण जपानच्या 2 राज्यांच्या राज्यपालांनी राज्य विधिमंडळाच्या आमदारांना जपान दौऱ्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार, 12 आमदारांचे एक शिष्टमंडळ लवकरच जपानच्या दौऱ्यावर जाणार होते. पण आता पंतप्रधानांनी काटकसरीचे आवाहन केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांचा हा प्रस्तावित जपान दौरा रद्द केला. त्यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात स्वागत होत आहे. अमित साटम यांचे मोदींच्या आवाहनाला हरताळ दुसरीकडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ फासल्याची बाब समोर आली आहे. अमित साटम यांनी नुकतीच मुंबईतील नालेसफाईच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या ताफ्यात तब्बल 25 गाड्या दिसून आल्या. यात अमित साटम यांच्या स्वतःसाठीच्या 2 गाड्या, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या गाड्यांचा समावेश होता. त्यांच्या या दौऱ्यावर आता राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. विशेषतः त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाला हरताळ फासल्याचा आरोप केला जात आहे. अमित साटम यांच्या गाड्या कदाचित पाण्यावर चालत असतील – रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी अमित साटम यांच्यावर उपरोधिक निशाणा साधला आहे. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनाला मुंबई भाजपा अध्यक्ष समित साटम यांचा 25 गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद! कदाचित त्यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात..! भाजीला पाण्याने फोडणी कशी द्यावी याचाही डेमो भाजपा नेत्यांनी जनतेला लवकरच द्यायला हवा! सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण’ अशीच झालीय, असे ते म्हणालेत. अमित साटम यांचा रोहित पवारांवर पलटवार दुसरीकडे, अमित साटम यांनी या प्रकरणी रोहित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले, रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वच गाड्या आमच्या ताफ्यातील होत्या, असे भासवण्याचा तुमचा हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे. आज मुंबई शहरातील नालेसफाईची अधिकृत पाहणी सुरू होती. या पाहणी दौऱ्यात सहपालकमंत्री, आमदार, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ताफ्यात 7-8 गाड्या नक्कीच होत्या, मात्र रस्त्यावरील सर्वच वाहने आमच्या ताफ्यात असल्याचे दाखवून ’25 गाड्यांचा ताफा’ असल्याचा बनाव तुम्ही करत आहात. आम्ही सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येऊन मुंबईची सेवा करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आहोत. मी 21 व्या वर्षी बारामती ऍग्रो सारख्या कंपनीचा सीईओ झालो नाही, तर संघर्षातून इथवर आलो आहे. त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांनी आम्हाला शिकवण देण्याची अजिबात आवश्यकता नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
जयंत पाटलांचा थेट मोदींवर निशाणा शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही या प्रकरणी मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांनी केलेले प्रत्येक आवाहन मध्यमवर्गीयांनी कर्तव्य म्हणून पाळले. थाळ्या वाजवायला सांगितल्या… वाजवल्या. दिवे लावायला सांगितले तेही लावले. आता युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी वापरण्याचे आवाहन पंतप्रधान महोदयांनी केले आहे. मध्यमवर्गासाठी काटकसर ही काही नवी गोष्ट नाही. त्यामुळे कर्तव्य म्हणून याही वेळेला ते साथ देतीलच. पण २०-३० गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचे काय? आपल्या राज्यात मुख्यमंत्र्यांपासून मंत्री, अधिकारी आणि हल्ली तर सत्ताधारी पक्षाचे आमदार डझनभर गाड्यांचा ताफा आणि सुरक्षा घेऊन फिरतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रधानमंत्री महोदयांचा आदेश शीर्ष मानून आपणही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी, फक्त एक गाडी आणि एक अंगरक्षक देण्यात यावा. मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच… पण सत्ताधाऱ्यांनीही “राष्ट्र प्रथम” हे धोरण कृतीत उतरवावे, ही अपेक्षा, असे त्यांनी म्हटले आहे.
