अनधिकृत बाईक टॅक्सी विरोधात सरकारची कठोर भूमिका:बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश, प्रताप सरनाईकांचे सायबर क्राईम विभागाला पत्र

0
db-temp-cover-marathi-2026-05-12t144929315_1778578563.jpg




राज्यात विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या ॲप आधारित बाईक टॅक्सी सेवांविरोधात राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. “या अनधिकृत सेवांमुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू असून, संबंधित कंपन्यांच्या मालकांवर थेट गुन्हे दाखल करा,” असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकांना अधिकृत पत्र पाठवून या ॲप्सचे ऑनलाईन संचालन तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक घेतली. या बैठकीत ‘ॲग्रीगेटर धोरणा’अंतर्गत बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकी टॅक्सी व कॅब टॅक्सी कंपन्यांवर कारवाई करण्यासंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. राज्य शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कटिबद्ध असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अनधिकृत व्यवस्थेला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. सरनाईकांनी सायबर क्राइम विभागाला लिहिलेले पत्र महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून ओला, उबर, रॅपीडो सारख्या अनाधिकृत बाईक टॅक्सी अॅप्सद्वारे प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये रॅपीडो सारख्या संस्थेच्या अनाधिकृत बाईक टॅक्सीचे प्रमाण अधिक आहे. सदर अॅप्स कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता अथवा परिवहन विभागाचे आवश्यक नियम पाळत नसताना सर्रासपणे प्रवासी सेवा देत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. प्रताप पत्रात पुढे लिहितात की, या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी नसून, चालकांची पडताळणी, विमा संरक्षण, महिला सुरक्षाविषयक उपाययोजना तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अत्यंत अपुरी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दि. २९/११/२०२५ रोजी मुलुंड लिंक मार्ग या ठिकाणी अनाधिकृत बाईक टॅक्सीचा आपघात होऊन एका महिलेचा दुर्देवी मुत्यु झालेला आहे. सदर प्रकरणी नवघर पोलिस ठाणे येथे प्रथम खबर अहवाल (FIR क्र.०४७९) दाखल झाला आहे. तसेच विविध पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय, शासनाच्या परिवहन नियमांचे खुलेआम उल्लंघन करून या अॅप्समार्फत आर्थिक व्यवहार केले जात असून, परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांच्या व्यवसायावरही अन्यायकारक परिणाम होत आहे. कायद्याला न जुमानता सुरू असलेली ही व्यवस्था राज्याच्या परिवहन व्यवस्थेसाठी गंभीर आव्हान बनत आहे. तरी ओला, उबर, रॅपीडो या संस्थांचे अनाधिकृत बाईक टॅक्सी अॅपचे ऑनलाईन संचालन त्वरित बंद करण्यात यावे. तसेच संबंधित अॅप कंपन्या, चालक व व्यवस्थापनाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच मोटारवाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. राज्य शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कटिबद्ध असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अनधिकृत व्यवस्थेला पाठीशी घातले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed