माऊली अन् तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता:संभाजी भिडेंच्या विधानावर शरद पवार गटाचा संताप; वारकऱ्यांतील कथित घुसखोरांवर भाष्य

0
image-resize-color-correction-and-ai-2026-05-12t11_1778564658.png




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांविरोधातील आपल्या मोहिमेंतर्गत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या मनू हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्याहून श्रेष्ठ होता या जुन्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. मनू हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्याहून श्रेष्ठ होता, असे विधान केल्यानंतरही आम्ही गप्प बसायचे का? असा सवाल या पक्षाने या प्रकरणी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका लेखाद्वारे वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा आरोप केला होता. वारकरी संप्रदायातील सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी होत आहे. समतेचा आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या वारकरी चळवळीत अशा विचारांची वाढ होणे ही चिंताजनक बाब आहे, असे ते म्हणाले होते. तेव्हापासून शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी अशा कथित घुसखोरांची पोलखोल सुरू केली होती. त्यातून त्यांच्यावर शाईफेकही झाली होती. त्यानंतर आता त्यांनी संभाजी भिडे यांच्या एका जुन्या विधानाचा दाखला देत प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांवर हल्ला चढवला आहे. मनुवादी हे वारकऱ्यातील घुसखोर ठरतात संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी मनू हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर भाष्य करताना विकास लवांडे म्हणाले, हे संतापजनक आणि आमच्या संतांचा घोर अपमान करणारे विधान केल्यानंतर तरी सुद्धा आम्ही गप्प बसायचं का? संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील स्वतःला साधू किंवा संत म्हणून घेणाऱ्या किती जणांनी याबाबत निषेध किंवा आंदोलन केले? या निषेधार्थ ते 20 घुसखोर कधी रस्त्यावर उतरले का? म्हणून मनुवादी हे वारकऱ्यातील घुसखोर ठरतात. सनातन वैदिक धर्म आणि संतांचा भागवत वारकरी संप्रदाय हा संघर्ष पूर्वीही होता आणि आजही आहे. संतांच्या विचाराचे खरे वारकरी आमच्या सोबत येतील, असे ते म्हणाले. शाईफेक प्रकरणी एकाही आरोपीला अद्याप अटक नाही उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्यावर शाईफेक झाल्याच्या घटनेला 2 दिवस लोटले तरी एकाही आरोपीला अद्याप अटक झाली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. माझ्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर दोन दिवस झाले. पण 15 पैकी एकाही आरोपीला अद्याप पर्यंत पोलिसांनी अटक केलेली नाही. पुण्यातील वापरलेल्या तीन चार चाकी गाड्या दोन रिवाल्वर काहीही ताब्यात घेतलेले नाही. गुन्हेगारांना पूर्ण मोकळीकआहे. सत्ताधारी मंत्री व काही आमदार त्यांना जाहीरपणे पाठबळ देत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का ? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. दोन दिवसांपूर्वी झाली होती शाईफेक विकास लवांडे दोन दिवसांपूर्वी आळंदी मातोबा तालुका हवेली येथे प्रवचनासाठी गेले होते. तेथील प्रवचन संपल्यानंतर ते पुण्याला परत येत होते. रस्त्यात 3 गाड्यांमधून आलेल्या संग्राम भंडारे व 10-15 गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर शाईफेक केली. त्यांना धक्काबुक्की केली. विकास लवांडे यांनी हल्लेखोरांनी आपल्याला पिस्तुल दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. शरद पवार गटाने कुणा-कुणाला घुसखोर म्हटले? विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात कथित घुसखोरी करणाऱ्या लोकांची एक यादी प्रसिद्ध केली होती. त्यात किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी, गौतम खट्टर, संभाजी भिडे गुरूजी, संग्राम भंडारे, तुषार भोसले, अक्षय भोसले, प्रकाश जवंजाळ, एकनाथ सदगीर, ज्ञानेश्वर जळकीकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन, संजय पाचपोर, भास्करगिरी महाराज, संजय नाना धोंडगे, राणा वासकर, चंद्रशेखर देगलूरकर, उदबोध पैठणकर, किशोर शिवणीकर, रामगिरी महाराज, शाम राठोड, निरंजन कोटेकर या कीर्तनकारांचा समावेश होता. हे सर्वजण वारकरी संप्रदायात घुसखोरी करून वारकरी संप्रदायाची सामाजिक समतेची वीण उसवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed