मेफेड्रोन कारखाना सुरू करण्याच्या तयारीत तिघे जेरबंद:कुरकुंभ प्रकरणातील आरोपीची मदत घेतल्याचे उघडकीस
![]()
पुणे पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) निर्मितीचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना अटक केली आहे. आरोपींनी कुरकुंभ अमली पदार्थ प्रकरणात जामिनावर असलेल्या एका आरोपीची मदत घेतल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून ४५ लाख रुपयांचे एमडी आणि महागड्या मोटारी असा एकूण एक कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वाघोली परिसरात मेफेड्रोन विक्री प्रकरणात सुरू असलेल्या तपासाचा भाग आहे. यापूर्वी पोलिसांनी अनिस शम्मू सय्यद (वय २८, रा. कल्याणी पार्क, मांजरी), हरी उत्तम उफाडे (वय ३५, रा. अजमेरा सोसायटीजवळ, सिद्धार्थनगर, वाघोली), सुमीत अशोक घुले (वय ४१, रा. मांजरी), प्रतीक उर्फ सोन्याबापू होले (वय ३२, रा. मांजरी) आणि ऋषीकेश अंकुश यनभर (वय २९, रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांना केसनंद परिसरातून अटक केली होती. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. तपासादरम्यान, आरोपींनी वाघोली, केसनंद, लोणीकंद, तसेच शिरूर तालुक्यात मेफेड्रोन विक्री केल्याची माहिती मिळाली. घुले याला आकाश अशोक ढवळे (वय २६, रा. शिरूर) याने मेफेड्रोन विक्रीसाठी दिल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी ढवळे आणि रामनिवास रानूराम बिष्णोई (वय २५, रा. मुंढवा) यांना अटक केली. या तपासात ढवळे आणि बिष्णोई हे विपिनकुमार श्रीरामसागर पंडित (वय ५४, रा. अंधेरी, मुंबई) याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. पंडित याला यापूर्वी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून साडेतीन हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. त्या प्रकरणात पंडितला अटक झाली होती, परंतु त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. पोलिसांना माहिती मिळाली की, ढवळे, बिष्णोई आणि पंडित हे तिघे जण मिळून मेफेड्रोन तयार करण्याचा कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत होते. पंडित त्यांना मेफेड्रोन तयार करण्यासाठी मदत करणार होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली. अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पल्लवी मेहेर, सहायक निरीक्षक विजय चंदन, प्रदीप मोटे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड, गहिनीनाथ बोयणे, महादेव कुंभार आणि राहुल तुपारे यांनी ही कारवाई यशस्वी केली.
