BSNL च्या तारा चोरणारे नऊ परप्रांतीय अटकेत:पुणे पोलिसांकडून ८० लाखांचा मुद्देमाल जप्त, क्रेनचा वापर

0
94509a89-c4f5-46da-a240-75a6a0b14c4d_1778482927004.jpg




पुणे शहरात बीएसएनएलच्या भूमिगत तांब्याच्या तारा चोरणाऱ्या नऊ परप्रांतीय चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. रामटेकडी औद्योगिक वसाहतीतून क्रेनचा वापर करून हे चोरटे तारा काढत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अस्लम सगीर खान, सलमान इद्रीस मलिक (दोघे रा. दिल्ली), आरिफ कुंदनखाँ खान, शोएब हारून खान, नबी मोहम्मद शान मोहम्मद (तिघे रा. उत्तर प्रदेश), नरेशकुमार शिवशरण (रा. हरयाणा), तसेच अनिस अन्सारी, अफाक अन्सारी आणि प्रवीण बागुल (रा. हडपसर, पुणे) यांचा समावेश आहे. वानवडी पोलिस रामटेकडी परिसरात सराईत गुन्हेगारांची चौकशी करत असताना, त्यांना रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या परिसरातून काही जण क्रेनच्या साहाय्याने भूमिगत तांब्याच्या तारा काढत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरट्यांना रंगेहाथ पकडले. चोरट्यांकडून ३४ लाख ८० हजार रुपये किमतीची तांब्याची तार, एक क्रेन, एक ट्रक आणि एक दुचाकी असा एकूण ८० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, उपनिरीक्षक अल्फाज शेख, गोपाळ मदने, अर्षद सय्यद, अभिजित चव्हाण, सर्फराज देशमुख आणि गणेश भुजबळ यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. अमली पदार्थ विक्रीतील आरोपीला मदत करणारा पोलिस निलंबित अमली पदार्थ विक्री प्रकरणात दाखल गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी दिले. केतन उत्तम धेंडे (रा. लोणी काळभोर) असे निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लोणी काळभोर भागात अमली पदार्थ विक्री प्रकरणात नुकतीच कारवाई केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिस कर्मचारी धेंडे यांनी या गुन्ह्यातील आरोपींना मदत करावी, यासाटी गुन्हे शाखेतील एका तपासी अधिकाऱ्याला दूरध्वनी केला होता. त्यांना प्रत्यक्ष भेटून त्याने प्रलोभन दाखविले होते. या प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप केला होता. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आल्यानंतर खंडणी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल पोलिस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर आरोपींना मदत करण्याचा ठपका ठेऊन धेंडे याला निलंबित करण्यात आले. धेंडे यांचे वर्तन पोलिस दलाचे प्रतिमा मलीन करणारे असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed