वसईत विवाह सोहळ्यानंतर तुंबळ हाणामारी:हुंड्यावरून आनंदाच्या सोहळ्यात वादाचे गालबोट, वधू-वर पक्षाकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल
![]()
वसई पश्चिमेकडील एका विवाहसोहळ्यात आनंदाच्या वातावरणाला हुंडा आणि देण्या-घेण्याच्या वादाचे गालबोट लागले आहे. किरकोळ वादातून सुरू झालेली शाब्दिक चकमक इतकी विकोपाला गेली की, दोन्ही पक्षांतील मंडळींनी एकमेकांवर अक्षरशः हल्ला चढवला. या राड्याचा ‘लाईव्ह’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लग्नाचा मांडव जणू काही रणांगण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याप्रकरणी माणिकपूर पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेकडील स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा संकुल परिसरात एका विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नविधी पार पडल्यानंतर हुंडा आणि देण्या-घेण्याच्या मुद्द्यावरून वधू आणि वर पक्षांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. काही वेळातच या वादाने हिंसक वळण घेतले आणि दोन्ही बाजूचे लोक एकमेकांवर तुटून पडले. या हाणामारीत काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करण्यासाठी काठ्या आणि इतर वस्तूंचा वापर करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पॉक्सोसह गंभीर गुन्ह्यांची नोंद या हिंसक घटनेनंतर दोन्ही पक्षांनी माणिकपूर पोलिस ठाणे गाठून एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. फिर्यादी इरसाद गुम यांनी दिलेल्या माहितीनुसार, वधू पक्षाने नवरदेवाच्या गटातील सदस्यांवर पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत अत्यंत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तर नवरदेवाच्या गटाने १५ ते २० जणांच्या जमावाने एकत्र येऊन बेदम मारहाण केल्याचा आरोप करत वधू पक्षाकडून तक्रार नोंदवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेकायदेशीर जमाव जमवणे, घातक शस्त्रांनी मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे अशा कलमांचा समावेश आहे. तपासाची चक्रे वेगाने; काही संशयित ताब्यात घटनेचे गांभीर्य ओळखून माणिकपूर पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. काही संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, इतर फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. लग्नाच्या मांडवात सुरू झालेला हा वाद आता थेट पोलिस कोठडीपर्यंत पोहोचला आहे. हे ही वाचा… लग्नातील गमतीचा झाला ‘राडा’:बुट लपवण्यावरून वधू-वर पक्ष भिडले, महिलांमध्येही ‘फ्री-स्टाईल’, जालन्यातील घटना; VIDEO लग्नामध्ये नवरदेवाचे बूट चोरण्याची आणि त्या बदल्यात मानपान किंवा पैसे मागण्याची परंपरा सर्वश्रुत आहे. मात्र, जालन्यातील अंबड तालुक्यातील नांदी परिसरात या परंपरेने लग्नाचा आनंद विरघळवून टाकला. बूट परत करण्याच्या बदल्यात मागितलेल्या पैशांवरून वधू आणि वर पक्षामध्ये असा काही वाद पेटला की, दोन्ही बाजूचे वऱ्हाडी थेट एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या राड्यामुळे मंगल कार्यालयाला एखाद्या युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सविस्तर वाचा…
