![]()
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. पंढरपूरला येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी एकदा नाही तर दोन वेळा विचार केला पाहिजे, असा टोला लगावताना रोहित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, “आषाढीच्या पूजेला येताय आणि या पवित्र भूमीत दिलेला शब्द पाळत नाहीत. जनाची नाही तर मनाची तरी थोडी लाज वाटू द्या,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रोहित पवार यांना राज्य सरकारने गिरीश महाजन यांच्यामार्फत अधिवेशनापूर्वी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 22 तारखेला अधिवेशन सुरू होऊनही अद्याप बैठक न झाल्याने रोहित पवार यांनी आज विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या ‘एल्गार यात्रे’ला सुरुवात केली. सरकारने पाहिले नसेल असे आंदोलन करणार याप्रसंगी राज्य सरकारवर सडकून टीका करताना रोहित पवार म्हणाले, “हा माझा नाही तर 44 लाख शेतकरी आणि मजुरांचा विश्वासघात या फडणवीस सरकारने केला आहे. मी 22 तारखेला अधिवेशनासाठी गेलो. मात्र माझे तिथे मनच रमले नाही. या पवित्र भूमीत दिलेले आश्वासन देखील हे सरकार पाळत नसेल तर अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांवर काय विश्वास ठेवायचा?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी, “आता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात लोकांमध्ये जाऊन संभाजीनगर येथे सरकारने पाहिले नसेल असे आंदोलन करणार,” असा थेट इशारा दिला आहे. रोहित पवार म्हणाले, काही महिन्यांपूर्वी या भागात अतिवृष्टी झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या होत्या. या नुकसानीसाठी सरकारने 35000 कोटी रुपयांची घोषणा केली होती. मात्र, मिळाली किती तर फक्त 12 हजार कोटी रुपये. पिक विम्याचा तर एक रुपया सुद्धा मिळाला नाही. अधिवेशनामध्ये कर्जमाफीसाठी 20000 कोटीची तरतूद केली. मात्र यातील 5000 कोटी तर 2017 मधले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना घोषणा केली 35000 कोटीची आणि मिळणार केवळ 14 ते 15000 कोटी असे हे फसवे सरकार असल्याची टीका पवारांनी केली आहे. पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर रोहित पवारांची टीका पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर सडकून टीका करताना रोहित पवार म्हणाले की, “आज बऱ्याच नेत्यांनी 85 कोटी रुपये घेऊन भूमिका बदलली, विचार बदलले आणि पार्टी बदलली.” या 85 कोटींच्या उल्लेखाचा नेमका संदर्भ गुलदस्त्यात ठेवताना त्यांनी विरोधकांना लक्ष्य करत, “माझ्यावर सोन्याचा चमचा घेऊन जन्मल्याची टीका करणारे आता या पैशातून स्वतःसाठी आणि आपल्या नातवांसाठी सोन्याचे चमचे खरेदी करणार आहेत का?” असा सणसणीत टोला लगावला. तसेच, “सहा खासदार आपल्या सोबत लढत होते ते आता गायब झाले आहेत,” असा चिमटा काढत आता शेतकऱ्यांनी स्वतःचा लढा स्वतःच लढला पाहिजे, असे थेट आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.
आषाढीच्या पूजेला येताय, जनाची नाही मनाची लाज वाटू द्या:रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप
