गुरू माऊली बंगाली विद्या शिकून गावी:हनुमान अवतार असल्याचा केला दावा, पैशांच्या पावसाच्या आमिषाने बडे अधिकारी, नेते जाळ्यात
.

स्वयंघोषित “माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुमच्या सर्व मानसिक आणि आर्थिक अडचणी दूर करतो,” असे आमिष दाखवून भक्तांना लुबाडणाऱ्या आढेगाव (ता. माढा) येथील नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली महाराज याच्या कृत्याच्या कहाण्या समोर येत आहेत. भविष्य बघण्यापुरता मर्यादित ‘खेळ’ चक्क बंगालमधील काळी विद्या आणि समाजमाध्यमाच्या रिल्सपर्यंत पोहोचला होता. भक्तांच्या खात्यातील शिल्लक रक्कमेचा आकडा सांगून विश्वास संपादन करणाऱ्या या बाबाने अल्पावधीतच सोलापूरपासून मुंबईपर्यंत माया जमवल्याचे त्यंाचे भक्त सांगत आहेत. नाना विरकर याचे मूळ गाव आढेगाव असून तिथे पिढ्यानपिढ्या ज्योतिष विद्या शिकणारे अनेक लोक आहेत. लहान वयातच नाना या लोकांच्या संपर्कात आला. ज्योतिषविद्येतून मिळणारा अमाप पैसा, सुधारलेले राहणीमान आणि दारात उभ्या असलेल्या महागड्या गाड्या पाहून नाना या क्षेत्राकडे आकर्षित झाला. यातूनच अधिक ‘सिद्धी’ मिळवण्यासाठी तो थेट बंगालला गेला आणि तिथे ७ ते ८ वर्षे काळी विद्या शिकून कोरोना काळात पुन्हा गावी परतला. रिल्सच्या माध्यमातून आपण हनुमानाचा अवतार असल्याचे त्याने भासवले. कुटुंबातील पीडा दूर करण्याचा दावा करण्यात तो यशस्वी झाला. भक्ताचा विश्वास संपादन करण्यासाठी तो एक अजब शक्कल लढवत असे; समोर आलेल्या भक्ताचे नाव सांगताच तो त्याचे बँक खाते क्रमांक आणि खात्यात असलेली नेमकी रक्कम सांगू लागला. यातूनच त्याने इंदापूर, सोलापूर, पुणे आणि मुंबई यांसारख्या शहरांत फ्लॅट्स घेतल्याचे समजते. नाना विरकर याने आपल्या चार-पाच एकर रानातच तीन ‘एसी’ रूम बांधून तिथेच आपला आलिशान दरबार भरवण्यास सुरुवात केली होती. त्याच्या दरबारात लोकप्रतिनिधी आणि बड्या शासकीय अधिकाऱ्यांची कायम वर्दळ असे. तेथे युवक कामावर होते. भोंदू खरात याच्यावर कारवाई झाल्यानंतर नाना काही काळ गायब झाला होता, असे गावकरी सांगतात. ^भोंदू बाबाकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी न घाबरता न टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अथवा स्थानिक पोलिसात येऊन तक्रार द्यावी.” अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक
लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील युवक निलेश भुईटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नाना विरकर आणि त्याचा भाऊ विकास विरकर या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून जिवंत कासव जप्त केले आहे. नाना विरकर हा अपत्यप्राप्ती, व्यवसायातील यश, राजकारणातील भरारी आणि आजारपणातून मुक्ती देण्याचे आमिष दाखवून भक्तांकडून भरमसाठ पैसे उकळत होता. घरात जिवंत कासव ठेवा, त्यामुळे सर्व पीडा दूर होतील. जर कुटुंबावर एखादे संकट किंवा वाईट दुर्घटना येणार असेल, तर या कासवाचा घाण वास येईल, असे सांगून तो भक्तांना भुलवत असे. आतापर्यंत त्याने अनेकांना जिवंत तसेच सिमेंटची कासवे दिली असून, पोलीस आता अशा हस्तकांचा आणि फसवणूक झालेल्या भक्तांचा शोध घेत आहेत.
२०२३ मध्ये कुर्डुवाडी जवळील एका व्यक्तीला मुलगा होत नाही आणि आजारपण दूर होत नाही, असे सांगून विरकर याने जाळ्यात ओढले होते. पैसे देऊन जिवंत कासव घेतल्यानंतरही त्या व्यक्तीला कोणताही फरक पडला नाही, उलट त्याला हृदयाच्या त्रासामुळे बायपास सर्जरी करावी लागली. जेव्हा या रुग्णाने पैसे परत मागितले, तेव्हा पंढरपूरमधील एक व्यक्ती आणि माढ्यातील एका ज्वेलर्सचा मालक पैसे घेऊन आले होते. यावरून या भोंदू बाबाचे माढा व पंढरपूरमधील आर्थिक लागेबांधे उघड झाले आहेत.
आजार बरे करण्याच्या नावाखाली ज्या रुग्णाला त्याने कासव दिले, त्याला अखेर बायपास सर्जरीच करावी लागली. हा प्रकार म्हणजे श्रद्धेच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार होता. आता पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर बुवाबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मोहोळ | टेंभुर्णी पोलिसांनी भोंदूगिरी करणाऱ्या नाना विरकर आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल केला असला तरी, त्यांच्याकडे कासव सापडूनही याप्रकरणी मात्र स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. नियमानुसार ज्या व्यक्तीकडे कासव सापडले, त्याला प्रथम नोटीस दिली जाते. त्यानंतरही संबंधिताने कासव वनविभागाकडे वर्ग केले नाही तरच गुन्हा दाखल करण्यात येतो, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
