हिंगोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३ टक्के:मागील वर्षीच्या तुलनेत निकालात घसरण, सीसीटीव्हीची नजर अन कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम
![]()
हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल ८३.२६ टक्के लागलाअसून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात तब्बल ९ टक्के घसरण झाली आहे. दहावी व बारावी परिक्षेमध्ये निकालात झालेली घसरण शैक्षणिक वर्तुळातून चिंता वाढविणारी ठरू लागली आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील सहा ते सात वर्षापासून कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे. यावर्षी देखील जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या पुढाकारातून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले. यावर्षी संवेदनशील परिक्षा केंद्रावर जादा पोलिस बंदोबस्त तसेच वाढीव पथके तैनात करण्यात आली होती. या शिवाय सर्वच परिक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात होते. या शिवाय प्रत्येक वर्ग खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्यांचा चांगलाच परिणाम दिसून आला. दोन ते तीन काॅपीकेसेस वगळता परिक्षा शांततेत पार पडल्या होत्या. दरम्यान, आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. हिंगोली जिल्हयातून इयत्ता दहावी परिक्षेत १६०७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५८३४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून त्यात २७६९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. ४०३२ विद्यार्थी प्रथमश्रेणीत, ४३११ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २०७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हयात एकूण १३१८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८३.२६ टक्के लागला आहे. दरम्यान, मागील वर्षी जिल्ह्याचा निकाल ९२.८० टक्के लागला होता. यावर्षी निकालामध्ये सुमारे ९ टक्के घसरण झाली असून यामुळे शैक्षणिक वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे काॅपीमुक्त अभियानाची झालेली परिणामकारक अंमलबजावणी व वर्ग खोल्यातील सीसीटीव्हीमुळे निकालावर परिणाम झाला असल्याचे बोलले जात आहे. औंढा तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८७ टक्के हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८७.४३ टक्के लागला आहे. त्यानंतर हिंगोली ८४.१३ टक्के, कळमनुरी ८२.६२ टक्के, सेनगाव ८२.५९ टक्के तर वसमत तालुक्याचा निकाल ८१.४५ टक्के लागला आहे.
