प्रगतीसाठी आदर्श निवडा; पीएसआय चटे यांचे मार्गदर्शन:संघर्ष योद्धा संस्थेच्या करिअर मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद
![]()
अमरावती येथील महाजनपुरा येथे ‘संघर्ष योद्धा बहुउद्देशीय संस्थे’ने ‘करिअर मार्गदर्शन सत्र २०२६’ चे आयोजन केले. या सत्रात राजापेठचे पोलिस उपनिरीक्षक रोशन चटे यांनी विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी आयुष्यात एक आदर्श निवडण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांची तत्त्वे आत्मसात केल्यास संकटांवर मात करून यश मिळवता येते, असे त्यांनी सांगितले. दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर निवडताना येणाऱ्या आव्हानांवर मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाजनपुरा येथील गजानन महाराज मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ठाणे येथे कार्यरत राज्य कर निरीक्षक सौरभ सावरकर आणि नगरसेवक योगेश विजयकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सौरभ सावरकर यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध संधी आणि स्पर्धा परीक्षांमधून मिळणाऱ्या पदांविषयी सविस्तर माहिती दिली. प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे, तर योग्य दिशा आणि नियोजनाची गरज असते, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. महाजनपुरा परिसराचे युवा नगरसेवक योगेश विजयकर यांनी स्थानिक तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या उपक्रमाचे कौतुक केले. लोकप्रतिनिधी म्हणून शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव पाठीशी उभे राहण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सदस्य जय सावरकर यांनी केले, ज्यात सत्राचा मुख्य उद्देश स्पष्ट करण्यात आला. समितीचे उपाध्यक्ष अतुल बोरकर आणि सदस्य कुणाल नांदुरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर विक्की गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नयन विजयकर, मुकेश बोरकर, आयुष सावरकर, अजय रावळे, समीर सावरकर, शेखर गायकवाड, आदित्य सावरकर आणि सागर बोरकर या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
